कार्यक्रमाला अनुपस्थितीत असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचे राज्यमंत्र्यांनी गाठले घर! - Minister of State Dattatreya Bharane visited to house of the senior activist | Politics Marathi News - Sarkarnama

कार्यक्रमाला अनुपस्थितीत असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचे राज्यमंत्र्यांनी गाठले घर!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

राज्यमंत्री भरणे व्यासपीठावर बसल्यानंतर रणसिंग आबा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा जाहीर कार्यक्रम होता. गेल्या दहा वर्षांपासून भरणे यांच्या सभा-कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावणारे ज्येष्ठ कार्यकर्ते हणमंतराव (आबा) रणसिंग (वय ८५) हे त्या कार्यक्रमास आले नसल्याचे राज्यमंत्र्यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. रणसिंग यांच्या अनुपस्थितीचे कारण विचारले असता ते आजारी असल्याचे भरणेंना कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर कार्यक्रम संपताच भरणे यांनी रणसिंग यांचे घर गाठले. त्यावेळी रणसिंग यांचा उतारवयातील उत्साह पाहून राज्यमंत्रीही आश्‍चर्यचकित झाले. (Minister of State Dattatreya Bharane visited to house of the senior activist)

इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून राजकीय कारकिर्दीस सुरुवात करणारे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ह्यांचे लोकसंपर्क हेच राजकारणातील बलस्थान आहे. सामान्यातील सामान्य माणसाशी संवाद साधत ती जपण्याची काम भरणे यांनी यशस्वीपणे केले आहे. आपल्या साधेपणाचा प्रत्यय भरणे यांनी अनेकदा दिला आहे. 

हेही वाचा : दिलीप माने सुभाष देशमुखांशी पुन्हा दोन हात करण्याच्या तयारीत

निमसाखर गावात एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री भरणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. गेल्या दहा वर्षांपासून निमसाखर परिसरात भरणे यांचा कोणताही कार्यक्रम असेल तर हणमंतराव रणसिंग कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावत असत. मात्र, त्या कार्यक्रमाला रणसिंग उपस्थित नव्हते. राज्यमंत्री भरणे व्यासपीठावर बसल्यानंतर रणसिंग आबा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबाबत भरणे यांनी कार्यकर्त्यांकडे चौकशी केली. त्यावेळी व्यासपीठावरील काहींनी त्यांना रणसिंग हे आजारी असल्याचे सांगितले. 

त्या कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, निमसाखर गावात माझी पहिलीच सभा आहे. त्या सभेला आबा आजारी असल्याने उपस्थित नाहीत. कार्यक्रम झाल्यानंतर राज्यमंत्री भरणे यांच्या गाड्याच्या ताफा पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असताना अचानक हणमंतराव रणसिंग यांच्या घराकडे वळला. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आपल्याला भेटायला आल्याचे पाहून हणमंतराव रणसिंग यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. राज्यमंत्री भरणे यांनी तुम्ही आजारी आहात, असे समजल्याने भेटायला आलो आहे, असे सांगितले. त्यावर आबा भडकले. ‘कुणी सांगितले मी आजारी आहे म्हणून, माझी तब्बेत एकदम ठणठणीत आहे. मला कमी दिसतंय एवढंच. मात्र मी कुणालातरी घेवून कार्यक्रमाला आलो असतो, मला निरोप का दिला नाही, असा उलटा प्रश्न रणसिंग यांनी केला. त्यांचा तो उत्साह पाहून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह उपस्थित नागरिक ही आश्‍चर्यचकित झाले. 

या वेळी ज्येष्ठ नागरिक भगवानराव रणसिंग, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष वीरसिंह रणसिंग, विकास रणसिंग उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख