अनलॉक होताच राज्यमंत्री भरणेंनी आणला इंदापूरसाठी 413 कोटींचा निधी  - Minister of State Bharane brings Rs 413 crore fund for roads in Indapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

अनलॉक होताच राज्यमंत्री भरणेंनी आणला इंदापूरसाठी 413 कोटींचा निधी 

राजकुमार थोरात 
शनिवार, 16 जानेवारी 2021

राज्यमंत्री भरणे हे निधी खेचून आणणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.

वालचंदनगर (जि. पुणे) : कोरोना आणि त्यानंतर अनलॉकला सुरुवात होताच राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात होताच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूरसाठी पुरवणी अर्थसंकल्पातून 413 कोटी 26 लाखांचा निधी मंजूर करून आणला. या निधीतून तालुक्‍यातील सात रस्त्यांची कामे केली जाणार असून त्याला लवकरच सुरुवात होईल, असे राज्यमंत्री भरणे यांनी स्वतः सांगितले. 

राज्यमंत्री भरणे हे निधी खेचून आणणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. कारण, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी इंदापूर तालुक्‍यासाठी सर्वाधिक निधी मंजूर केला होता. भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना विरोधी पक्षाचे आमदार असूनही सर्वाधिक निधी मिळविण्यात भरणे आघाडीवर होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोना महामारी आली, त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते. त्याचा परिणाम राज्याच्या आर्थिक स्थितीवर झाला होता. 

सध्या कोरोनाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. तत्पूर्वीच सरकारने एक एक गोष्टी अनलॉक करायला सुरूवात केली होती. उद्योगाची चाके चालू लागल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. त्यातून राज्याचे आर्थिक गाडेही रुळावर येत गेले. त्याचा परिणाम हिवाळी अधिवेशनादरम्यान दिसून आला. 

राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नुकतचा झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांतून इंदापूर तालुक्‍यातील सात रस्त्यांसाठी तब्बल 413 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील निधी मंजूर झालेले रस्ते व रक्कम :

►भिगवण-खानोटा ते बारामती रस्ता  : 217 कोटी 68लाख 
►भवानीनगर-शेटफळगढे-खडकी रस्ता : 173 कोटी 58 लाख 
►बोरी ते शेळगाव रस्ता : 6 कोटी 
►अंथुर्णे-भरणेवाडी-बिरंगुडवाडी रस्ता : 5 कोटी 
►कर्मयोगी कारखाना ते निमगाव केतकी रस्ता : 3 कोटी 
►पुणे-सोलापूर महामार्ग ते बाभूळगाव-भाटनिमगाव ते भांडगाव रस्ता : 3 कोटी 
►इंदापूर-बेडशिंगे-अवसरी ते भांडगाव रस्ता : 5 कोटी 

इंदापूर तालुक्‍याच्या सर्वांगिण विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आण्यासाठी प्रयत्न केले जातील. तालुक्‍यातील सर्व गावांत विकासाची गंगा पोचविणार आहे. 
-दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख