पुणे पदवीधर : चंद्रकांतदादांवरील नाराजीने मेधा कुलकर्णी मनसेच्या वाटेवर? - Medha Kulkarni MNS candidate out of resentment over Chandrakantdada? | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधर : चंद्रकांतदादांवरील नाराजीने मेधा कुलकर्णी मनसेच्या वाटेवर?

उमेश घोंगडे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निमित्ताने अनेक राजकीय घडामोडींची शक्यता...

पुणे : भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या पक्षावर नाराज असल्याचे गेले वर्षभर दिसून येत आहे. पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर तर त्या भाजपचा त्याग करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे. भाजपकडून त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी मिळणे अशक्य असल्याने त्या मनसेकडून नवा राजकीय श्रीगणेशा करणार असल्याचेही बोलले जाते.

प्रत्यक्षात या साऱ्या घडामोडींवर मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता आपण भाजप कधीच सोडू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केेले. त्यामुळे मनसेकडून उभे राहण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.  

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीच्या पहिल्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन सोमवारी पुण्यात झाले. या कार्यक्रमाला कुलकर्णी उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू झाली आहे. कार्यक्रमाचे कुलकर्णी यांना निमंत्रण देऊनही त्या आल्या नाहीत, असे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र, गेल्या वर्षभरापासून आपल्याला डावलेले जात आहे तसेच भेट मागूनही कुलकर्णी यांना चंद्रकात पाटील यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याच्या नाराजीतून त्या कालच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्या भाजप सोडणार असल्याचे सोशल मिडियात फिरू लागले. मध्यंतरी त्या विविध प्रश्नांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या. तेव्हाही त्या भाजप सोडणार असल्याचे बोलले जात होते. 

मनसेच्या आॅफरबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की मी मनसेत जाणार, यात कोणतेही तथ्य नाही. मात्र भाजपमध्ये मला डावलले जात आहे, अशी माझी भावना झाली आहे. मला कार्यक्रमांची निमंत्रणे दिली जात नाहीत. माझे म्हणणे ऐकले जात नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली. 

पुणे पदवीधरमधून मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा विचार होणार का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांपूर्वी पुण्यात विचारण्यात आला होता. तेव्हा सगळे मिळून निर्णय़ घेऊ असे उत्तर त्यांनी दिले होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख