Marxist Communist Party's flag on 'this' Gram Panchayat | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 'या' ग्रामपंचायतीवर झेंडा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 मे 2020

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जुन्नर तालुक्यातील एका ग्रामपंचातीवर झेंडा फडकावला आहे. एका तरूण युवकाची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.  

जुन्नर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जुन्नर तालुक्यातील एका ग्रामपंचातीवर झेंडा फडकावला आहे. एका तरूण युवकाची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. आंबे -पिंपरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दुलाजी धोंडू सावळे गुरुजी यांच्या मृत्यु झाल्यामुळे या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी शुक्रवारी (ता. २९) रोजी मतदान झाले. यात मुकुंद पांडुरंग घोडे या युवकाची सरपंचपदी निवड झाली आहे. 

या निवडीमुळे आंबे -पिंपरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रथमच झेंडा फडकवत जुन्नर तालुक्यात शिरकाव केला आहे. 
सरपंच पदासाठी शुक्रवारी (ता. २९) मतदान झाले. यावेळी  मुकुंद पांडुरंग घोडे आणि गोविंद धावजी रेंगडे या सदस्यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले. घोडे यांना रंजना घोडे, मीरा डगळे, व त्यांचे स्वत: अशी तीन मते मिळाली तर  रेंगडे यांना भरत सावळे, लता किर्वे व त्यांचे स्वतः अशी तीन मते मिळाली. अलका काठे या ग्रामपंचायत सदस्य तटस्थ राहिल्या. 

समसमान मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. लवांडे यांनी चिठ्या टाकून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला. यात मुकुंद घोडे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी. एस. लवांडे यांनी केली. मुकुंद घोडे हे २४ वर्षाचे आहेत. अर्थशास्त्र या विषयात ते एम.ए. आहेत. एस. एफ. आय या विद्यार्थी संघटना व पुरोगामी चळवळीचे ते सक्रीय कार्यक्रर्ते आहेत. आंबे घाटातील रस्ता, आश्रमशाळा या विषयावर त्यांनी आवाज उठवला आहे. आरोग्य शिबिरे, विद्यार्थी मेळावे यांचे आयोजन त्यांनी केले आहे.    

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. रोजगारासाठी गावातील कोणीही गावाबाहेर जाणार नाही. येत्या १५ दिवसांत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीची कामे चालू केली जातील. 
मुकुंद घोडे, सरपंच, आंबे -पिंपरवाडी 

 

ही बातमी वाचा : पालकांशी संवाद साधल्यानंतर 'हा' निर्णय घेणार 

मुंबई : विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा शैक्षणिक सत्र सुरु करतानाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्याबाबत पालकांशी चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडयांनी दिली. राज्यातल्या पालक संघटनांशी आम्ही संवाद साधून त्या बद्दलचे निर्णय घेतले जाणार आहे. शिक्षक आमदारांशी आपण संवाद साधला आहे. येत्या सोमवारी विरोधी पक्षांशीही याबाबत संवाद साधणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वर्षी माणुसकी या धाग्यावर सर्व व्यवहार होतील असे सांगितले. हे दोघेही महासेवा या रमेश प्रभू आणि करण नाईक यांनी सुरू केलेल्या संवादात बोलत होते. मुले समुहात वावरतील, शौचालये वापरतील त्यामुळे या संदर्भात अत्यंत सावध पावले टाकली जातील, मुलांबाबत पालक उत्तम निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घेतले जाईल, असेही गायकवाड म्हणाल्या. शाळांनी शुल्क वाढवायचे नाही, असे शाळांना कळविले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख