पिस्तुल काढून दहशत माजविणाऱ्या गावगुंडांना पोलिस आणणार वठणीवर... - ManojKumar Lohia's warning to goons | Politics Marathi News - Sarkarnama

पिस्तुल काढून दहशत माजविणाऱ्या गावगुंडांना पोलिस आणणार वठणीवर...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणे तसेच धाक दाखविण्यासाठी प्रसंगी गोळीबार करणारे गावगुंड आणि गावठी पिस्तुल विक्रीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी 'अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे.

पुणे : गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणे तसेच धाक दाखविण्यासाठी प्रसंगी गोळीबार करणारे गावगुंड आणि  गावठी पिस्तुल विक्रीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी 'अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. गावठी कट्टा अन् दहशतीच्या संस्कृतीचा खात्मा करण्यासाठी पोलिसांनी अशांची पाळेमुळे खोदण्यास सुरूवात केली आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी बुधवारी शिरूर पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे बारकाईने निरीक्षण करीत आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गुन्हेविषयक कामगिरी तुलनेने सरस ठरली आहे. 

अवैध हत्यारे जप्ती, गुंडांची धरपकड, मोक्कांतर्गत कारवाई आणि झोपडपट्टी दादांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. प्रामुख्याने मोठे गुन्हे घडू नये, यावरही लक्ष केंद्रीत केले आहे. गावठी पिस्तुल कनेक्शन मध्यप्रदेशातील सेंधवा पर्यंत जात असल्याचे समोर आले आहे, असे लोहिया यांनी सांगितले.

गावठी पिस्तुल कनेक्शनचा प्रशासकीय चौकटीतून तपास करण्याबरोबरच; थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. घनदाट जंगल, संशयितांकडून सातत्याने जागा बदलणे अशा काही अडचणी आहेत. पण त्यावर मात करून त्यांची पाळेमुळे खणून काढली जातील. रिव्हॉल्वर संस्कृतीवर जरब बसविण्यासाठी यातील गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए च्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असा इशारा लोहिया यांनी दिला.

अधिकाऱ्यांना गुंडांशी जवळीक पडेल महागात

अनेक वर्षे एकाच ठिकाणी राहिलेल्या पोलिस कर्मचा-यांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. गुंड-गुन्हेगारांशी संबंध, चुकीच्या गोष्टींना थारा दिल्याचे निदर्शनास आल्यास अजिबात सहन केले जाणार नाही. संबंधितांवर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, डीवायएसपी, अतिरिक्त एसपी यांच्यामार्फत नजर ठेवली जाईल, असेही लोहिया यांनी स्पष्ट केले. 

... तर पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

शासनाच्या नियमावलीनूसारच पोलिसांच्या बदल्यांचा निर्णय घेतला जात आहे. एकाच तालुक्यात सहा किंवा बारा वर्षांपासून असलेल्या पोलिस कर्मचा-यांच्या बदल्यांचा निर्णय विचाराधीन आहे. यामध्ये काही आव्हाने असली तरी कायद्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असे लोहिया यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख