माळेगाव आता नगरपंचायत होणार.. - malegaon will now be nagar panchayat | Politics Marathi News - Sarkarnama

माळेगाव आता नगरपंचायत होणार..

कल्याण पाचांगणे 
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

आता माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे आता माळेगाव नगरपंचायतीत रुपांतर होणार आहे. 

माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे नगरपंचायत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगास ग्रामपंचायत निवडणूक न घेण्याबाबत आज पत्र देण्यात आले आहे. त्यात माळेगावच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून माळेगावमध्ये नगरपंचायत व्हावी, अशी स्थानिक ग्रामस्थांची इच्छा होती. त्या दृष्टीने आता माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे आता माळेगाव नगरपंचायतीत रुपांतर होणार आहे. 

ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात येऊन नगरपंचायत अस्तित्वात येणार असल्याने निवडणूकीचा दुहेरी खर्च होऊ नये, या उद्देशाने नगरविकास विभागाने पत्र पाठवून सूचना देण्यात आली आहे. माळेगावच्या नगरपंचायतीबाबत जिल्हाधिका-यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. नगरपंचायतीचे निकष पूर्ण करत असल्याने रुपांतरणाची प्राथमिक उदघोषणा काढण्याची कार्यवाही सुरु असल्याचे निवडणूक आयोगास पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

माळेगावची लोकसंख्या 35 हजारांवर असून भौगोलिक व्याप्ती विचारात घेता येथे नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या निर्णयास अनुकूल असल्याने हा निर्णय वेगाने झाला आहे. बारामती शहराला लागूनच माळेगाव असून शैक्षणिक संकुल, साखर कारखान्यासह इतर निवासी वस्ती मोठी असल्याने नगरपंचायतीचा लाभ या भागाला मिळणार आहे. सार्वजनिक सुविधांसह अनुदानातही वाढ होणार असल्याने या भागाचा विकास वेगाने होण्यास त्याची मदत होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख