लोणी काळभोर, लोणीकंद पोलिस ठाणी `ग्रामीण`मध्येच राहणार - loni kalbhor and lonikand police stations will remain with rural police | Politics Marathi News - Sarkarnama

लोणी काळभोर, लोणीकंद पोलिस ठाणी `ग्रामीण`मध्येच राहणार

जनार्दन दांडगे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

शासनाच्या आदेशामुळे संभ्रम...

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर व लोणीकंद या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात झाल्याची चर्चा सुरु झाली असली तरी, राज्य शासनाकडून याबाबतचा स्वतंत्र आदेश निघाला नसल्याने, वरील दोन्ही पोलिस ठाणी पुढील आदेश येईपर्यंत तरी ग्रामीण पोलिस दलातच राहणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लोणी काळभोर व लोणीकंद या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात झाला नसल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

राज्य सरकारने आज पुणे पोलिस आयुक्तालयातील परिमंडळाच्या फेररचनेचे आदेश दिल्यानंतर यासंदर्भातील बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. त्यानुसार तातडीने ही दोन्ही ठाणी वर्ग झाल्याचेही सांगण्यात आले.

पुणे पोलिस आयुक्तालयाने या पूर्वी केलेल्या मागणीनसार, राज्य सरकारच्या गृह विभागाने पुण्याच्या पोलिस आयुक्तालयाची चारऐवजी पाच झोनमध्ये पुनर्रचना करण्यास सोमवारी (ता. २६) परवानगी दिली. त्यात लोणीकंद हे परिमंडळ चारमध्ये आणि लोणी काळभोर हे परिमंडळ पाचमध्ये दाखविण्यात आले.  लोणी काळभोर व लोणीकंद या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे शहर हद्दीत करण्याबाबत स्वतंत्र आदेश नाही. त्यामुळे ही दोन ठाणी वगळून पुणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांच्या परिमंडळाची नवीन रचना येत्या एक नोव्हेंबरपासून अस्तित्त्वात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख