पुण्यातील लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल होऊ शकतो.... पण वडेट्टीवार नाव घ्यायचे विसरले... - Lockdown in Pune can be lifted fully but Wadettivar forgets to announce | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातील लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल होऊ शकतो.... पण वडेट्टीवार नाव घ्यायचे विसरले...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 जून 2021

पहिल्या टप्यात १८ जिल्हे अनलॅाक करण्यात आले आहे. 

मुंबई : राज्यातील लॅाकडाऊन टप्प्याटप्प्याने हटविण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केला. त्यानुसार जेथे पाॅझिटिव्हीट रेट (शंभर कोरोना चाचण्यामागे आढळणारे रुग्ण) हा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि जेथे आॅक्सिसन बेडवरील रुग्णांची संख्या 25 टक्क्यांच्या आत आहे, अशा पहिल्या गटातील पूर्ण व्यवहार हे चार मे पासूनच सुरळीत होणार  आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड येथील पाॅझिटिव्हीटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षाही खाली आहे. मात्र तेथील लाॅकडाऊन उठविण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली आहे. 

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा तीनही ठिकाणचा एकत्रित पाॅझिटिव्हीटी रेट गृहित धरल्याने पुणे जिल्हा हा सर्वाधिक पाॅझिटिव्हीटी रेट असलेल्या चौथ्या गटात गेला आहे. पुणे जिल्ह्याचा दर हा 12.6 टक्के आहे. तर आॅक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्या 21.73 टक्के आहे. या गटात फक्त रायगड आणि पुणे हे दोनच जिल्हे आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अद्याप जास्त आहे. त्यामुळे त्याचा फटका पुणे शहरालाही बसत आहे. 

जिल्हा हे युनिट धरताना हा घोळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने दोन दिवसांपूर्वीच प्रत्येक महापालिका हे स्वतंत्र युनिट धरणार असल्याचा आदेश जारी केला होता. मात्र आपत्ती व्यवस्थापन कक्षाला त्याची कल्पना नसल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कठोर निर्बंध तसेच राहण्याचा धोका आहे. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि 25 टक्केच ऑक्सिजन बेड ज्या ठिकाणी व्याप्त अशा ठिकाणी लॉकडाउन राहणार नाही. तेथील सर्वच व्यवहार सुरू होणार आहेत. 
 
हे  अठरा जिल्हे पू्र्णपणे अनलॅाक होणार

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा , चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर , नागपूर, नांदेड, नाशिक परभणी,ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ

लेव्हल 2 मधील जिल्हे (अंशतः लाॅकडाऊन उठविणार)

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार, मुंबई आणि मुंबई उपनगर

लेव्हल 3 मधील जिल्हे (लाॅकडाऊन राहणार)

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर

लेव्हल 4 चे जिल्हे (काही कडक निर्बंध राहणार)

पुणे, रायगड
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख