खेड शिवापूर टोलनाक्‍यावर कर्मचाऱ्याकडून वकिलास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ  - Lawyer insulted by staff at Khed Shivapur toll Naka | Politics Marathi News - Sarkarnama

खेड शिवापूर टोलनाक्‍यावर कर्मचाऱ्याकडून वकिलास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

या प्रकरणाबाबत राजगड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खेड-शिवापूर (जि. पुणे) : टोल नाक्‍यावर वाहनांची एवढी गर्दी का? अशी विचारणा केल्याने सोमवारी (ता. 9 नोव्हेंबर) रात्री एका वकिलास आणि त्यांच्या मोटार चालकास खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील एका कर्मचाऱ्याकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. 

दरम्यान, या प्रकरणाबाबत राजगड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानिमित्ताने खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील टोल कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना करण्यात येणारी दमदाटी, शिवीगाळ हा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

रस्त्याची दुरवस्था आणि वाहनांच्या रांगामुळे प्रवासी आधीच त्रस्त आहेत. पण, या त्रस्त प्रवाशांना खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांकडून शिव्यांचा बोनस प्रसाद मिळत आहे. या टोल नाक्‍यावर प्रवाशांना अरेरावी, शिवीगाळ आणि दमदाटी असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या प्रकारांमुळे प्रवासी वैतागले आहेत. 

सोमवारी रात्री टोल नाक्‍यावर वाहनांची एवढी गर्दी का? अशी विचारणा केल्याने एका वकिलाला आणि त्यांच्या मोटारीच्या चालकाला एका टोल कर्मचाऱ्याकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. या प्रकाराविषयी राजगड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. 

पुणे-सातारा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. तर अनेक ठिकाणी खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालये नाहीत. तसेच, टोल नाक्‍यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगेत वेळ वाया जात आहे. या सर्व प्रकाराने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच टोल नाक्‍यावर होत असलेल्या गैरसोयींबद्दल टोल कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर प्रवाशांना शिवीगाळ आणि दमदाटी केली जात आहे. टोल कर्मचाऱ्यांच्या या उद्धट वर्तनाचा अनुभव अनेक प्रवाशांना आला आहे. 

ऍड. श्रीनिवास येलेरी यांनी सांगितले की, "टोल नाक्‍यावर प्रवाशांना टोल देऊनही विनाकारण शिवीगाळ, दमदाटी आणि धमकावले जात आहे. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. शिवीगाळ आणि दमदाटी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे आवश्‍यक आहे.' 

प्रवाशांना टोल नाक्‍यावर येणाऱ्या विविध अडचणी हाताळण्यासाठी टोल नाक्‍यावर प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात येतील. प्रवाशांशी कोणीही उद्धट वर्तन करू नये, अशा सर्वांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

-अमित भाटिया, 
व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख