EXCLUSIVE चंद्रकांत पाटील यांच्या नावे बनावट आदेश : दोनशे कोटींचा जमीन घोटाळा

मुख्य सूत्रधारांना शोधणार का?
CHANDRKANT PATIL
CHANDRKANT PATIL

पुणे : तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश तयार करून पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरातील वनखात्याची सुमारे 18 एकर जमीन हडपण्याचा डाव उघडकीस आला आहे.

`सरकारनामा`ला मिळालेल्या माहितीनुसार या जमिनीचा सातबाराही संबंधित व्यक्तींच्या नावावर झाला होता. मात्र वनखात्याने दाखविलेल्या सतर्कतेमुळे महसूल यंत्रणा जागी झाली. संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र हवेलीच्या तहलीलदार तृप्ती कोलते यांनी पोलिसांना दिले. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार बाजारभावाप्रमाणे या जमिनीची किंमत सुमारे दोनशे कोटी रुपये आहे. या साऱ्या प्रकारामागे कोणते धनाढ्य बिल्डर आहेत, याचा शोध पोलिस घेणार का याची उत्सुकता आहे.

`हडपसर येथील सर्व्हे क्रमांक 62 येथील सात हेक्टर 68 हेक्टर एवढे वनक्षेत्र वतन म्हणून देण्यात आले होते, असा दावा अर्जदार पोपट पांडुरंग शीतकल यांनी करत ही जमीन कायमस्वरूरपी आपल्या नावावर करून द्यावी, अशी मागणी महसूल यंत्रणांकडे करण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयातही दावा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने या मागणीवर विचार करून निर्णय द्यावा, असा आदेश राज्य सरकारला दिला होता. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी शीतकल यांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर हा दावा तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाखल झाला होता. चंद्रकांत पाटील यांनी हे म्हणणे अयोग्य ठरवत शीतकल यांचा दावा 2018 मध्येच नाकारला होता.

या सगळ्या घडामोडींनंतर शीतकल यांनी ही जमीन आपल्या नावावर करावी, असा आदेश महसूलमंत्र्यांनी दिला असल्याचा बनावट सोळा पानी आदेश हवेली तहसीलदारांकडे केला. त्यानुसार त्यांच्या नावावर सातबारा झालादेखील होता. तहसीलदार कोलते यांनी `सरकारनामा`ला दिलेल्या माहितीनुसार बनावटरित्या तयार केलेला हा आदेश हुबेहुबरित्या खरा वाटत होता. त्यावरील तारखा, सही व शिक्के, निकालपत्रातील नोंदी हे नेहमीच्या महसूल खात्याच्या आदेशाप्रमाणेच दिसून येत होते. त्यामुळे महसूलमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार संबंधित व्यक्तींच्या नावावर सातबाराही करण्यात आला.

त्यानंतर उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी ही जमीन वनखात्याची असून त्यावरील वनक्षेत्राचा शिक्का कायम असल्याने ती हस्तांतर करता येत नाही, असे हवेली तहसीलदारांना कळविले होते. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी खरेच असा आदेश दिला आहे का, याचा शोध घेण्यात आला. तर चंद्रकांत पाटील यांनी खरे तर याचिकाकर्त्यांच्या विरोधात निकाला दिला असल्याचे मूळ आदेशात दिसून आले. ही जमीन वनखात्याची असल्याचा निर्वाळा देत ती खासगी व्यक्तींकडे हस्तांतरीत करता येत नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी संबंधितांनी आपल्या सोयीचा आदेश तयार करून तो तहसीलदारांकडे दिला. त्यावर वेगाने कारवाई झाली, त्यामुळे संबंधितांचे नाव साताबऱ्यावर आले. 

आता हे नाव रद्द करून बनावट आदेश तयार केल्याबद्दल संबंधितांविरुद्ध फसवणुकीची तक्रार कोलते यांनी खडक पोलिसांकडे दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या जमीन प्रकरणात कागदोपत्री वेगळी नावे असतात आणि प्रत्यक्षात सूत्रधार वेगळेच असतात, असे अनेकदा दिसून आले आहे. पोलिस त्यांचा शोध घेणार का, याची उत्सुकता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com