शिवसेना आमदार दिलीप मोहितेंचा राजकीय सूड घेईल 

त्यांच्या डोक्यात किडे वळवळताहेत त्यांचा बंदोबस्त करू.
Khed's next MLA will be from Shiv Sena: Sanjay Raut
Khed's next MLA will be from Shiv Sena: Sanjay Raut

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड तालुक्यात शिवसेना पंचायत समितीच्या राजकारणाचा राजकीय सूड घेईल. इकडची दुनिया तिकडे होईल, पण खेडचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल. खेडची जखम भळभळती आहे. दबा धरून बसलेल्या बिबट्याप्रमाणे आम्ही अंगावर जाऊ. पंचायत समितीतील बंडखोर गद्दारांना माफी नाही, अशी जोरदार टीका शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी येथे केली. (Khed's next MLA will be from Shiv Sena: Sanjay Raut)

खेड तालुका शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख माऊली कटके, रामदास धनवटे, अशोक खांडेभराड, शिवाजी वरपे, नितीन गोरे, देवीदास दरेकर, बाबाजी काळे, तनुजा घनवट, विजया शिंदे, ज्योती अरगडे, किरण मांजरे आदी उपस्थित होते. 

राऊत म्हणाले, 'खेडमध्ये आघाडीधर्म पाळला गेला नाही. खेडच्या आमदारांकडे थोडी माणुसकी असती, तर असे घाणेरडे राजकारण त्यांनी केले नसते. शिवसैनिकांनी जरा शिस्त पाळली, तर मोहिते घरी बसतील. राजकीय सूड घ्यायचे कार्यकर्त्यांनी कधी विसरू नये. त्यांच्या डोक्यात किडे वळवळताहेत त्यांचा बंदोबस्त करू. त्यांच्या डोक्यात विष आहे, कचरा आहे, तो काढला जाईल. यापुढील प्रत्येक निवडणुकीत येथे भगवा फडकावायचा आहे.' 

खेडमध्ये शिवसैनिकांवर अन्याय झाला. तो करणारे कुणीही असो अथवा अधिकारी असो, त्यांना सोडणार नाही. खोटे पुरावे तयार करून, खोट्या प्रकरणात अडकवून कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवले आहे. त्या प्रत्येक दिवसाचा हिशेब दिला जाईल, असे त्यांनी सुनावले. 

मागच्या विधानसभा निवडणुकीत युती असूनही खेडमध्ये भाजपने अपक्ष उमेदवार दिल्याने शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांचा पराभव झाला. ही भाजपची पहिली गद्दारी झाली. भाजपने आमचे उमेदवार ठिकठिकाणी पाडले. आमच्या पाठीत सातत्याने खंजीर खुपसला; म्हणून आम्ही त्यांचे सरकारच पाडले, असे राऊतांनी सांगितले. 

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या पंचायत समिती सदस्यांना क्षमा नाही. त्यांना आणि आमदार मोहितेंना येत्या निवडणुकीत गाडल्याशिवाय, राहणार नाही आणि आढळरावांना पुन्हा लोकसभेवर पाठविणार, असा निर्धार मिर्लेकर यांनी व्यक्त केला.

स्वतःचा जीव केवढा आणि मला माफी नाही, अशी धमकी दिली आहे. खेड तालुक्यात स्वर्गीय सुरेश गोरेंच्या काळात आनंद, शांतता व कायदा होता. आता गोरगरिबांना अन्यायाला सामोरे जावे लागते. केशव अरगडेंवर खोटा गुन्हा दाखल केला. हे पाप कुठे फेडणार? बिहारसारखे गुंडाराज खेड तालुक्यात सुरू आहे. अधिकारी त्यात सामील आहेत. प्रांताधिकारी अन्याय करीत आहेत. पण शिवसेनेचा अंत पाहू नका. नाहीतर रस्त्यावर उतरू, असा इशारा आढळरावांनी दिला. 

भाजपचे रामहरी आवटे, मुरलीधर गवळे, नंदकुमार शेटे, कल्याणी बोत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रामदास धनवटे यांनी प्रास्ताविक केले. माऊली कटके व केशव अरगडे यांची भाषणे झाली. सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले. बाबाजी काळे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com