मोहितेंचा आणखी एक चमत्कार : आढळराव, राऊतांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सभापतींचा सत्कार

चौधरी यांचा सत्कार होत असताना राऊत आणि मोहिते हे एकमेकांना नमस्कार करत होते.
Khed NCP's Sabapati's felicitated in the presence of Adhalrao, Raut
Khed NCP's Sabapati's felicitated in the presence of Adhalrao, Raut

पुणे : खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदस्यांकरवी अविश्वास ठराव आणून तो मंजूर करून घेत रिक्त पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सभापती निवडून आणण्याची किमया आमदार दिलीप मोहिते यांनी करून दाखवली. या प्रकरणावरून टीका करणारे खासदार संजय राऊत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीच्या सभापतींचा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार घडवून आणला. (Khed NCP's Sabapati's felicitated in the presence of Adhalrao, Raut)

खेडचे सभापती पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदस्यांनी बंड करत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर अविश्वास दाखल करणाऱ्या सदस्यांवर पोखरकर यांनी हल्ला केला होता. त्या प्रकरणात त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. पोखरकर यांच्याविरेाधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यानच्या काळात आमदार मोहिते आणि आढळराव यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राजगुरुनगर येथे येऊन आमदार मोहिते यांच्या जबरदस्त आसूड ओढले होते. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमदार मोहिते यांना आवरा; अन्यथा आमच्या ताब्यात द्या. आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांचा बंदोबस्त करू’ असे आवाहन केले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा घेण्यात आलेल्या मतदानावेळी पोखरकर यांच्याविरोधातील अविश्वास मंजूर झाला. त्यानंतर नवा सभापती निवडताना आमदार मोहितेंनी चमत्कार करत अवघ्या चार सदस्यांवर खेडचा सभापती राष्ट्रवादीचा करून दाखवला. पंचायत समितीत शिवसेनेचे आठ सदस्य असतानाही त्यांनी हा राजकीय डाव यशस्वी करून दाखवला.

राजगुरुनगरला काला झालेल्या मेळाव्यातही खासदार राऊतांसह शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी आमदार मोहिते यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. पंचायत समितीतील अविश्वास ठरावाच्या राजकारणचा शिवसेना राजकीय सूड घेईल. खेडचा पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल, असे इशारे दिले होते.   

त्यानंतर आज आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आज ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संजय राऊत, शिवाजीराव आढळराव आणि दिलीप मोहिते हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्या कार्यक्रमातच या दोघांच्या उपस्थितीत मोहिते यांनी खेडचे राष्ट्रवादीचे सभापती अरुण चौधरी यांचा सत्कार सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते करून आणखी एक चमत्कार करून दाखवला. चौधरी यांचा सत्कार होत असताना राऊत आणि मोहिते हे एकमेकांना नमस्कार करत होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाषणाला सुरूवात करताना खासदार राऊत यांनी ‘आमचे प्रिय आमदार दिलीप मोहिते...’ असा उल्लेख केला होता. त्यावेळी व्यासपीठावरील नेत्यांसह उपस्थितांनी हसून टाळ्याचा कडकडाट करत दाद दिली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com