आमदार मोहिते हनी ट्रॅप; शैलेश मोहितेंची राष्ट्रवादीतून होणार हकालपट्टी?

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Khed NCP demanded the expulsion of Shailesh Mohite
Khed NCP demanded the expulsion of Shailesh Mohite

खेड :  खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. हे कटकारस्थान करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते यांची हकालपट्टी करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तालुक्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे ही मागणी केली आहे. तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे,  अॅड. सुखदेव पानसरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

आमदार मोहिते यांनी अहोरात्र मेहनत घेऊन, खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. अशा नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्, शैलेश मोहिते व राहुल कांडगे वारंवार करत आहेत. चाकण मराठा मोर्चा आंदोलन आणि इतरही काही प्रकरणात त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. आता देखील सातारा येथील एका युवतीला हाताशी धरून, पैशांचे व पुणे येथे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून, आमदारांसाठी हनी ट्रॅप लावून  बदनाम करण्याचे षड्यंत्र डॉ. शैलेश मोहिते, राहुल कांडगे आणि सोमनाथ शेडगे या तिघांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच या विश्वासघातकी लोकांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, असे त्यांनी नेत्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या घटनेचा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करीत असून, अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते. त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी, अन्यथा खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

शैलेश शिवाजी मोहिते-पाटील आणि  राहूल किसन कांडगे यांनी साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आ.दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये ओढत बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपये उकळण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला 1 लाख रुपये संशयितांनी दिले होते. मात्र, त्या युवतीनेच याची माहिती आमदारांच्या पुतण्यास फोन करून दिली. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. त्या युवतीने पोलिसांना सांगितले की, शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि.12 एप्रिल रोजी साताऱ्यातील फ्लॅटवर भेटण्यासाठी आले होते.  त्यांनी आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. तू पुतण्याच्या माध्यमातून आमदार यांच्याकडे नोकरी माग व घसट वाढव. आमदारांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ, नंतर आपण त्यांना बदनामीची भीती तसेच पोलीस केसची भीती दाखवू,. यामुळे ते आपल्याला भरपूर पैसे देतील, त्याबद्‌ल्यात तुला जास्त पैसे आणि पुण्यात  फ्लॅट घेऊन देतो.

आम्ही तिघांनी पूर्ण प्लॅन केला असून तू फक्त त्यात सहभागी हो, असे सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यां तिघांनी त्याबदल्यात तिला वेळोवेळी एकूण 1 लाख 4 हजार रूपये दिले होते. मात्र, मनाला न पटल्याने त्या युवतीने आमदारांचा पुतण्या मयुर यांना फोन करून सदर प्लॅन सांगितला. यानुसार मयूर यांनी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नसून तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com