सुळेंनी टि्वट केलं अन् जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले दौंडमधील यात्रेकरु झाले मार्गस्थ... - Jammu and Kashmir pilgrims from Daund can travel help of MP Supriya Sule  | Politics Marathi News - Sarkarnama

सुळेंनी टि्वट केलं अन् जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले दौंडमधील यात्रेकरु झाले मार्गस्थ...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

दौंड तालुक्यातील ३१ जणांच्या यात्रेकरुना खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने पुढील प्रवास करणे शक्य झाले.

दौंड : जम्मू काश्मीर येथे सहलीसाठी जाऊन अडकलेल्या दौंड तालुक्यातील ३१ जणांच्या यात्रेकरू गटाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने पुढील प्रवास करणे शक्य झाले. यात पाटस येथील डॉ. विकास वैद्य यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच अन्य सहकारी असून दहा ते अकरा महिलांसह बहुतांश सगळे साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निर्बंध लागू आहेत. तत्पूर्वीच दौंड येथून निघून १५ एप्रिल रोजी हे सर्वजण अमृतसर येथे पोहोचले होते. तेथील सुवर्ण मंदिर आणि तेथून जम्मू काश्मीर मधील वेगवेगळी ठिकाणे आणि वैष्णोदेवीचे दर्शन असा त्यांचा प्रवास आहे.  गुलमर्ग आणि पहलगाम यथे भेटी देऊन काल सकाळी जम्मूला जाण्याकरिता ते निघाले होते ; मात्र कोझिगुंड येथे त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवले. कर्फ्यु लागला असून तुम्हाला पुढे जाता येणार नाही, असे सांगण्यात आले. 
 
परक्या मुलुखात अडकून पडल्यामुळे डॉ. वैद्य यांनी खासदार सुळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ही बाब कळवली. त्यानुसार लागलीच सर्व सूत्रे हलली. सुळे यांनी ट्विट करून तेथील प्रशासकीय अधिकारी आणि अन्य वरिष्ठ यंत्रणांना याबाबत सहकार्य करण्यास सांगितले. त्याच वेळी त्यांच्या कार्यालयातूनही जम्मू काश्मीर येथील वरिष्ठ लष्करी तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सहकार्य करण्याविषयी पाठपुरावा घेण्यात आला. तेथील अधिकाऱ्यांनीही विलंब न लावता आवश्यक त्या कागदोपत्री पूर्तता करून घेत सर्व यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार सर्वजण मार्गस्थ झाले असून वैष्णोदेवीचे दर्शन झाल्यावर आम्ही महाराष्ट्रात येण्यास परत निघू, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. 

 
खासदर सुप्रियाताई सुळे यांचे सुद्धा कार्य शरद पवार साहेबांप्रमाणेच आहे. कधीही हाक मारली तरी त्या सदैव मदतीस तयार असतात. आम्ही फोन करताच तातडीने सर्व सूत्रे हलली आणि आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या सुमारे तीन तास अडकवून पडलेल्या गाड्या लागलीच सोडण्यात आल्या. यासाठी सुप्रियाताई सुळे यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.
- डॉ. विकास वैद्य,
पाटस, ता. दौंड., पुणे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख