वाबळेवाडी शाळेचा प्रश्न आता अजित पवारांच्या कोर्टात 

शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो हर्ट झाला असावा.
The issue of Wablewadi school will now go to Ajit Pawar's court
The issue of Wablewadi school will now go to Ajit Pawar's court

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो हर्ट झाला असावा. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर राज्यात १२०० शाळा उभ्या करण्याचे जाहीर केल्याने मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशानेच वाबळेवाडी शाळेवर शिंतोडे उडविले जात आहेत.

या प्रकरणात आम्ही वारे गुरुजी, वाबळेवाडी शाळा आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत. आम्ही पुढील दोन दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवारांना समक्ष भेटून वाबळेवाडी शाळेसाठी लढणार असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे सरचिटणीस केशवराव जाधव व बारामती तालुकाध्यक्ष हनुमंतराव शिंदे यांनी जाहीर केले. प्रशासनाने तत्काळ या प्रकरणी दखल घेऊन कार्यवाही न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही जाधव यांनी दिला. (The issue of Wablewadi school will now go to Ajit Pawar's court)

गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्याला कंटाळून मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे, जयसिंग नऱ्हे व एकनाथ खैरे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. उर्वरित १० शिक्षकही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी बारामती येथील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मुख्याध्यापक वारे, वाबळेवाडी ग्रामस्थ यांना भेटले. वाबळेवाडी शाळेवर होत असलेल्या चिखलफेकीबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे या शिष्टमंडळाने सांगितले. 

भेटीनंतर केशवराव जाधव म्हणाले, शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो-हर्ट झाला असावा; म्हणूनच प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून हा प्रकार सुरू झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. शाळेत जागा ३० आणि २ हजार जणांना प्रवेश पाहिजे असेल, तर ते हाताळणे अवघडच आहे. प्रवेश प्रक्रिया व आर्थिक व्यवहार हे संपूर्णत: ग्रामस्थांनी हाताळले आहेत.

वारे गुरुजींनी जी शिक्षण पद्धती विकसीत केली आहे, त्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आवश्यक होते ते ग्रामस्थांनी हाताळले. संपूर्ण शाळेचे व्यवस्थापन ग्रामस्थांचे आहे. मग वारे गुरुजींनाच टार्गेट का केले जाते आहे. आम्ही वाबळेवाडी शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून येतोय. येथील प्रकल्प बारामतीत राबविण्याचा प्रयत्न करतो. तसेच, राज्यातील हजारो शाळांसाठी वाबळेवाडी प्रेरणादायी आहे. 

अर्थमंत्री अजित पवार यांनी मागील अर्थसंकल्पात राज्यात वाबळेवाडीच्या धर्तीवर १२०० शाळा उभारण्याची घोषणा केली आहे. अशी परिस्थिती असताना प्रशासन कुणाच्या दबावाखाली असे विचित्र वागतंय, त्याचीही माहिती पवारांना देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

जाधव यांच्यासमवेत संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव शिंदे, सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड, सदस्य शशिकांत अनपट, राजेंद्र बालगुडे, सोमनाथ चौगुले आदींनी वारे गुरुजी व वाबळेवाडी ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर या शिष्ठमंडळाने गटविकास अधिकारी विजयकुमार नलावडे व गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आदींची शिरुर येथे जाऊन भेट घेतली. वाबळेवाडी शाळेबाबत चुकीचे वागाल तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.  

वाबळेवाडी शाळेबाबतच्या चर्चेने राज्यभरात आम्हाला सध्या फोन येत आहेत. संपूर्ण राज्यातील शिक्षणक्षेत्र बेचैन आहे. याबाबतची वस्तुस्थिती अजित पवार यांना भेटून सांगणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com