कीर्तन करायचे की कॉमेडी हे इंदोरीकरांनी ठरवावे.... 

''निवृत्ती महाराज यांनी राजकीय आश्रय घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदणीसाठी उशीर झाला. तुम्ही खोटेपणाने किती दिवस वारकरी संप्रदायाच्या आड लपून स्वतःला वाचवणार. इंदूरीकरांनी यापुढे कीर्तन करायचे की कॉमेडी करायची हे ठरवावे.''
Trupti Desai.
Trupti Desai.

पुणे  : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर काल पुत्रप्राप्तीचा संदेश दिल्यामुळे प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेर येथे आरोग्य विभागाकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर तृप्ती देसाई म्हणाल्या, ''निवृत्ती महाराज यांनी राजकीय आश्रय घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदणीसाठी उशीर झाला. तुम्ही खोटेपणाने किती दिवस वारकरी संप्रदायाच्या आड लपून स्वतःला वाचवणार. इंदूरीकरांनी यापुढे कीर्तन करायचे की कॉमेडी करायची हे ठरवावे.'' 


इंदुरीकरांवर कीर्तनातून पुत्रप्राप्तीचा संदेश दिल्यामुळे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार आणि वारंवार कीर्तनातून महिलांचा अपमान करीत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भुमाता ब्रिगेडने तसेच इतर काही संघटनांनी केली होती. पण राजकीय दबावापोटी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु कीर्तनातून पुत्रप्राप्तीचा संदेश देणाऱ्या इंदुरीकरांवर आता संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरताना प्राचीन ग्रंथांचा आधार या वाक्याला आहे, असे सांगितले जात होते .परंतु पुत्रप्राप्तीचा सल्ला देणे, जाहीरात करणे हे पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार कायदेशीर गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. 


कारवाईला टाळाटाळ करण्यासाठी तसेच मी किती योग्य आहे हे दाखवण्यासाठी हा वाद मुद्दामहून काही संबंध नसताना वारकरी संप्रदायाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला, हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यावर खालच्या पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु शेवटी सत्याचाच विजय होत असतो. इंदुरीकरांवर आता संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झालेला आहे आता त्याची सुनावणी होईल आणि सर्व सत्य जनतेसमोर बाहेर येईल असे देसाई यांनी व्यक्त केले. 

या प्रकरणाचा पाठपुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही केला होता पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला कीर्तनातून सांगितल्याने प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टिका झाली होती. दोन तासांच्या कीर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते, असे सांगत इंदोरीकर महाराजांनी कीर्तन सोडून शेती करेल, असे नंतर एका कीर्तनात सांगितले होते. निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्या कथित वक्तव्याच्या मुद्द्यासंदर्भात पुरावा म्हणून सादर करण्यात आलेली सीडी सायबर सेलकडे पाठविण्यात आली होती.

इंदोरीकर यांनी त्यांच्या कीर्तनातून एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे विधान त्यांनी एका किर्तनातून केले होते. त्यावेळी त्यांच्यावर टिका झाली. तृप्ती देसाई यांनीही नगरला येऊन इंदोरीकर महाराजांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तृप्ती देसाईंचे समर्थक व इंदोरीकर महाराजांचे समर्थक यांच्यात शाब्दिक वाद पेटला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com