तुम्ही लवकर बरे व्हाल ! : आढळरावांनी दिल्या एकेकाळच्या जिवलग मित्राला शुभेच्छा  - I'm sure you'll recover soon from Corona ; Moisture of friendship cherished by Adhalrao | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

तुम्ही लवकर बरे व्हाल ! : आढळरावांनी दिल्या एकेकाळच्या जिवलग मित्राला शुभेच्छा 

गणेश कोरे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

वळसे पाटील आणि आढळराव पाटील एकेकाळचे जिवलग मित्र होते.

पुणे : राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः "ट्विट'द्वारे दिली. ट्विटला त्यांचे एकेकाळचे जिवलग मित्र आणि सध्याचे राजकीय प्रतिस्पर्धी, शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार यांनी रिप्लाय दिला आहे. "तुम्ही लवकर बरे व्हाल, अशी मला खात्री आहे' असा प्रतिसाद देत त्यांनी आपल्यातील प्रेमाचा ओलावा अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले आहे. 

कोरोनाची लागण झाल्याची माहिती देताना वळसे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, "नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहेत. माझी प्रकृती उत्तम असून मला कसलाही त्रास होत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी.' 

या ट्विटला माजी खासदार आढळराव पाटील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,"दिलीपराव, आपण लवकरात लवकर बरे होऊन समाजकारणात सक्रिय व्हाल, ह्याची मला खात्री आहे. आपणांस उत्तम, निरोगी आयुष्य लाभो, अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व्यक्त करतो.' 

वळसे पाटील आणि आढळराव पाटील एकेकाळचे जिवलग मित्र होते. दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून दोघांचे बिनसले. त्या वेळी आढळराव यांनी शिवसेनेत प्रवेश करत सलग तीन टर्म खासदारकी मिळवली. या 15 वर्षांत दोघांमधून विस्तवही जात नव्हता. मात्र, दोघे एकमेकांच्या अडिअडचणींना एकमेकांना साथ देत असत. वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच आढळराव पाटील यांनी लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत आपल्यातील उमेद्या मित्राची पुन्हा एकदा दर्शन घडविले आहे. 

हेही वाचा : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण 

मुंबई ः राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती वळसे पाटील यांनी ट्विट करून स्वतः दिली आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी (ता. 30 ऑक्‍टोबर) त्यांचा वाढदिवस आहे. 

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळातील दहा ते बारा मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे. 

दिलीप वळसे पाटील आज सकाळी मंत्रालयात हजर होते. कॅबिनेट बैठक सुरू होण्याआधी त्यांना कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील घरी निघून गेले. 

ट्विटमध्ये वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. माझी प्रकृती उत्तम असून मला कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, धन्यवाद. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख