ठेकेदारांना पैसे मागणाऱ्यांना मी सोडणार नाही : अजित पवार  - If you ask for money from contractors, I will hand over to police: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ठेकेदारांना पैसे मागणाऱ्यांना मी सोडणार नाही : अजित पवार 

कल्याण पाचांगणे 
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या वार्षिक सभेत एका ठेकेदाराकडून एका सरपंचांनी पैशाची मागणी केल्याची तक्रार आली होती, त्या घटनेचा समाचार अजित पवार यांनी जाहीर सभेतच घेतला.

माळेगाव (जि. पुणे) : "अजित पवारांनी रस्त्यांसह विकास कामांना निधी द्यायचा आणि सरपंचांनी ठेकेदारांकडे पैशाची मागणी करायची, हे खपवून घेतले जाणार नाही. शेवटी जनतेच्या पैशावर जर कोणी डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मी त्याला सोडणार नाही. त्याला यापुढे पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. तो कितीही जवळचा कार्यकर्ता असो अथवा नसो,'' अशा भाषेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाचखोरी करणाऱ्यांना नाव न घेता दम भरला. 

बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या वार्षिक सभेत एका ठेकेदाराकडून एका सरपंचांनी पैशाची मागणी केल्याची तक्रार आली होती, त्या घटनेचा समाचार अजित पवार यांनी जाहीर सभेतच घेतला. पवार म्हणाले,""राज्याचा कारभार करीत असताना मी बारामतीला अधिकचे देण्याचा प्रयत्न करीत असतो. जिरायत भागात पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण, सांडपाण्याच्या सुविधा पुर्णत्वाला आण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.'' 

"यापुढील काळातही बारामतीसाठी कोट्यवधी रुपये मंजूर करणार आहे. परंतु तालुक्‍यातील एका सरपंचाने रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराकडे पैशाची मागणी केली व सांगितले की मी अजितदादांकडे या कामाचा पाठपुरावा केला आहे, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अर्थात मोबाईलवरचे ते बोलणे संबंधित ठेकेदाराने रेकॉर्ड केले आणि मला पाठविले. याबाबत मी जरा संयमाची भूमिका घेतली; अन्यथा पोलिसांच्याच ताब्यात देण्याचा माझा विचार होता. यापुढे अशा तक्रारी आल्या तर मी कोणाला सोडणार नाही,'' असा निर्वाणीचा इशाराच अजित पवारांनी तालुक्‍यातील सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांना दिला. 

हेही वाचा : पुण्यात पुन्हा लॉकडाउन नाहीच : जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, तो व्हिडिओ जुना 

पुणे : पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याचा जुना व्हिडिओ शनिवारी (ता. 20 फेब्रुवारी) सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, लॉकडाउन होणार ही अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. 

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा संसर्ग वाढू नये, तो आटोक्‍यात राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्‍लासेस, शाळा-महाविद्यालये, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख