`मी एक-दोन मिनिटांत निर्णय घेतला... आता कशाला उगाळत बसता?`

अजित पवार यांचा सवाल...
ajit pawar
ajit pawar

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे तडकाफडकी निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यातून एखादी चूक झाली असेल तर ती मान्य करून पुढे जाण्याचे त्यांचे धोरण असते. अजित पवार यांच्या इमेज मेकिंगचे कंत्राट सहा रुपये खर्च करून बाहेरच्या संस्थेला देण्याचे ठरले होते. त्यावरून टीका झाल्यानंतर अजित पवार यांनी हा निर्णय तातडीने रद्द केला. गेल्या चोवीस तासांतील या घटनांबद्दल आज पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिले. (Ajit Pawar clarifies about outsoucing contract for his image making)

ते म्हणाले, ``‘मी एक-दोन मिनिटांत निर्णय रद्द केला. मी आलो का तुमच्याकडे माझी प्रसिद्धी करायला? मला ते लक्षात आणून दिल्यावर निर्णय रद्द केला. माहिती आणि प्रसिद्ध खातं असताना असं करायला नको होतं. मी मागंपुढं बघत नाही. माझ्या वाचण्यात आलं, मी ताबडतोब निर्णय रद्द करण्याचा आदेश दिला. आता कशाला उगळत बसता?`` असे तीन वाक्यांत स्पष्टीकरण देऊन त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काय घडले होते?

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले होते. हा सोशल मिडिया सांभाळण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च येणार होता. 

उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.


मलिक यांची भाजपवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारासाठी जो खर्च होणार होता त्याकडे जे बोट दाखवत आहेत त्यांनी स्वतः सत्ता असताना किती खर्च केला याकडे लक्ष द्यावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. सरकारमध्ये काम करत असताना  प्रचार व प्रसार, माहिती देणे गरजेचे असते पण सहा कोटी रुपये खर्चावर जे लोक बोट ठेवत आहेत त्यांनी त्यांच्या सरकारमधील मुख्यमंत्री व प्रत्येक मंत्र्यांवर किती पैसे खर्च केले यावर लक्ष द्यायला हवे असेही नवाब मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com