पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर गृहमंत्री वळसे पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्त्व्य    - Home Minister Dilip Walse Patil's reaction in Pooja Chavan's death case   | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर गृहमंत्री वळसे पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्त्व्य   

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

राठोड यांची आगामी मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chvan) आत्महत्या प्रकरणानंतर राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते. यामुळे तत्कालिन वनमंत्री व शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी आता पूजाच्या आई-वडिलांनी वानवडी पोलिसांकडे (Pune Police) जबाब नोंदवला आहे. त्यानंतर राठोड यांची आगामी मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी (ता. १६ जुलै) पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.  (Home Minister Dilip Walse Patil's reaction in Pooja Chavan's death case) 

वळसे पाटील म्हणाले की, ''पुणे पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. मी त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नाही. पोलिसांवर दबाव असण्याचे काही कारण नाही. पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. पोलिसांनी कोणाला अहवाल दिला. या संदर्भात मला माहिती नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर त्याबद्दल सांगता येईल. अहवाल येण्यापूर्वीच निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.  

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील!

दरम्यान, पुण्यातील वानवडीजवळील महंमदवाडी येथे 7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन  उडी मारून तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर वानवडी पोलिसांकडून पुढील तपासात कोणताही प्रगती झालेली नव्हती. या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर वानवडी पोलिसांकडून केवळ तपास सुरु असल्याचे उत्तर दिले जात होते. आता पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला आहे. 

 
वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पूजाच्या आई-वडिलांना पुण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. तसेच, पूजाच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचेही त्यांनी जबाबात स्पष्ट केले. पूजाचा आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा : आघाडी सरकारच्या विरोधात आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. भाजपने या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. विशेषत: या प्रकरणाशी संबंधित कुठलीही माहिती बाहेर सांगू नये, अशी तंबीही पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख