हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमलता बडेकर  - Hemalatha Badekar as the Deputy Chairman of Haveli Panchayat Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमलता बडेकर 

जनार्दन दांडगे 
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

बडेकर यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्द यादव यांचा सोळा विरुध्द तीन अशा मोठ्या फरकाने पराभव केला. 

उरुळी कांचन (पुणे)- हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी महाविकास आघाडीच्या हेमलता बाळासाहेब बडेकर यांची बहुमताने निवड़ झाली आहे.

हवेली पंचायत समितीच्या महात्मा गांधी हॉलमध्ये झालेल्या उपसभापतीच्या निवडणुकीत बडेकर यांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्द यादव यांचा सोळा विरुध्द तीन अशा मोठ्या फरकाने पराभव केला. 

राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे हवेली पंचायत समितीचे यापूर्वीचे उपसभापती युंगधर उर्फ सनी मोहन काळभोर यांनी एक महिण्यापुर्वी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता.

यामुळे उपसभापतीपदाची निवडणुक घेण्यात आली. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत, आघाडीच्यावतीने बडेकर यांनी तर भाजपच्या वतीने अनिरुद्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

अर्ज माघाऱी घेण्याच्या निर्धारीत वेळेत दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्याने, मतदान घेण्यात आले. यात बडेकर यांना सोळा तर अनिरुध्द यादव यांना तीन मते मिळाली. 

हवेली पंचायत समितीमध्ये सध्या वीस पंचायत समिती सदस्य आहेत. तर अंजिक्‍य घुले यांचे निधन झाल्याने, एक जागा रिक्त आहे. वीसपैकी राष्ट्रवादी कॉग्रेसचे दहा सदस्य आहेत. तर शिवसेनेचे सहा व भाजपचे तीन सदस्य आहेत. राज्यात महाआघाडीची सत्ता असल्याने, हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून बडेकर यांच्या रुपाने एकच उमेदवार दिला होता. तर भाजपने यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. 

दरम्यान उपसभापतीपदी विराजमान होताच, आमदार अशोक पवार यांच्या हस्ते हेमलता बडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके,

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सामाजिक व न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, माजी उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, माजी जिल्हा परीषद सदस्य रमेश कोंडे, रमेश मेमाने उपस्थित होते. 

आमदार पवारांची दुसऱ्यांदा बाजी.. 
हेमलता बडेकर या शिरुरचे आमदार अशोक पवार यांच्या कट्टर समर्थक असून, उरुळी कांचन-शिंदवने या गणातुन पंचायत समिती सदस्य म्हणुन निवडुन आलेल्या आहेत. दहा महिण्यापूूर्वी उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही अशोक पवार यांनी आपलेच कट्टर समर्थक सनी काळभोर यांना उपसभापती करुन, हवेलीवर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले होते.

सनी काळभोर यांचा उपसभापतीपदाचा दहा महिण्याचा कालावधी पुर्ण होताच, त्यांना राजीनामा देण्यास सांगून उपसभापतीपदी आपल्याच दुसऱ्या कट्टर समर्थकाला उपसभापती बनवले आहे. यातून पवार यांनी विरोधकांना व पक्षात राहुन गडबड करणाऱ्यांना शिरुर व हवेलीचेही आपणच बॉस असल्याचा इशारा दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख