आमदार यशवंत मानेंना धक्का : जातप्रमाणपत्राप्रकरणी आठवड्यात म्हणणे मांडण्याची नोटीस  - Hearing on MLA Yashwant Mane's caste certificate in court on July 12 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आमदार यशवंत मानेंना धक्का : जातप्रमाणपत्राप्रकरणी आठवड्यात म्हणणे मांडण्याची नोटीस 

प्रमोद बोडके
गुरुवार, 1 जुलै 2021

या प्रकरणी येत्या 12 जुलैला सुनावणी होणार आहे.

सोलापूर : मोहोळचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद यशवंत माने यांच्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रावर मुंबई उच्च न्यायालयाने दोन याचिका स्वीकारल्या आहेत. न्यायालयाने आमदार माने यांना नोटीस काढली असून त्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी येत्या 12 जुलैला सुनावणी होणार आहे. (Hearing on MLA Yashwant Mane's caste certificate in court on July 12)

मोहोळचे शिवसेना नेते सोमेश क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या याचिकेत आमदार यशवंत माने व त्यांचे भाऊ हणमंत माने, सोपान माने, त्यांची पुतणी सुजाता माने हे वकिलामार्फत न्यायालयात हजर झाले असून एका आठवड्यात त्यांना उच्च न्यायालयात आपली बाजू प्रतिज्ञापत्राने मांडावी लागणार आहे.

क्षीरसागर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच मुद्द्यावर चिखली (ता. मोहोळ) येथील अमित गवळी यांनीदेखील याचिका दाखल केली आहे. गवळी यांच्या याचिकेवर 24 जून रोजी सुनावणी झाली असून न्यायालयाने आमदार यशवंत माने यांना नोटीस काढून 12 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी 29 जून रोजी होती. या याचिकेमध्ये आमदार यशवंत माने, भाऊ हणमंत माने व सोपान माने व त्यांची पुतणी सुजाता माने या आपापल्या वकिलामार्फत हजर झाले आहेत.

हेही वाचा : ....अन्‌ नारायण पाटील गटाचा जल्लोष क्षणात मावळला 

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या संविधानपीठाचे न्यायमूर्ती आर. डी. धानुका व व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठाने प्रतिवादी असणाऱ्या आमदार यशवंत माने यांच्यासह त्यांचे बंधू हनुमंत विठ्ठल माने, सोपान विठ्ठल माने व पुतणी सुजाता हनुमंत माने या तिघांना नोटीस काढली असून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अमित गवळी यांची याचिका सोमेश क्षीरसागर यांच्या याचिकेसोबतच चालविली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार एका आठवड्याच्या आत माने कुटुंबीयांना आपली बाजू न्यायालयासमोर मांडावी लागणार आहे.

क्षीरसागर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. अनिल साखरे, ऍड. अनंत वडगावकर, ऍड. प्रसाद कुलकर्णी, ऍड. आमरीश खोले यांनी बाजू मांडली आहे. आमदार यशवंत माने यांच्यावतीने ऍड. जगदीश आरवड (रेड्डी), हणमंत माने, सोपान माने व सुजाता हनुमंत माने यांच्यावतीने ऍड. रोहीत गुप्ता, ऍड. प्रभाकर टंडन, ऍड. आर्गम मालू तर, सरकारच्या वतीने ऍड. व्ही. एम. माळी हे काम पाहत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख