शिवतारेंनी आणलेली गुंजवणी योजना ठेकेदारधार्जिणी होती : संजय जगताप 

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरमध्येच आणि शेतकऱ्यांच्या विरोधाशिवाय होईल.
Gunjavani scheme brought by Vijay Shivtare was for the contractors : Sanjay Jagtap
Gunjavani scheme brought by Vijay Shivtare was for the contractors : Sanjay Jagtap

खळद (जि. पुणे) : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरमध्येच आणि शेतकऱ्यांच्या विरोधाशिवाय होईल, असे सांगून आमदार संजय जगताप यांनी विमानतळाच्या जागेबाबत मात्र अनिश्‍चितता कायम ठेवली. 

गुंजवणी जलवाहिनीबाबत काहींनी माझा अभ्यास नसल्याची टीका केली होती. मात्र, चार वर्षांपूर्वीच त्याचा अभ्यास केला असून त्यात सुधारणा केल्या आहेत. आधीची योजना केवळ ठेकेदारधार्जिणी आणि 90 टक्के बागायती असणाऱ्या भागासाठीच होती. वास्तविक पुरंदरच्या दुष्काळी भागाला याची अधिक गरज असून त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाला सूचना केल्या आहेत. भोर, वेल्हे आणि पुरंदरच्या हक्काचे पाणी योग्य वेळेत मिळणार असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले. 

खळद (ता. पुरंदर) येथे आमदार संजय जगताप यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी जगताप यांनी सर्व प्रस्तावित कामांबाबत माहिती दिली. पुरंदर हवेलीचा रखडलेला विकास आता मार्गी लागणार असून येथील महत्त्वकांक्षी प्रकल्प पालखी महामार्ग, विमानतळ, गुंजवणी लवकरच मार्गी लागतील. तसेच, अतिवृष्टीची पीक नुकसान भरपाईपोटी 18 कोटी 50 लाखांची रकमही लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग होणार असून यामुळे नुकसान झालेले रस्ते, पुलांची कामे लवकरच सुरू होतील, असे आमदार जगताप यांनी नमूद केले. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी - पंढरपूर पालखी महामार्गावरील पुरंदर विधानसभा मतदार संघाच्या हद्दीतील भेकराई नगर ते नीरा या मार्गाचे काम एका वर्षात पूर्ण होणार आहे. भूसंपादनासाठी 395 कोटी रक्कम मंजूर असून यातील 5 गावांना 68 कोटींचे वाटप झाले आहे. उर्वरित रक्कम दोन ते तीन आठवड्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्या टप्प्याने वर्ग होणार असल्याचे आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

उरुळी येथील कचरा डेपोला 25 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. याबाबत अनेक आंदोलने झाली असून हा डेपो रद्द करावा, यासाठी प्रदूषण महामंडळाच्या माध्यमातून सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मंतरवाडी ते कोंढवा बायपास रस्त्याचे कामही उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून निधी मिळवून सुरू झाले आहे. 

याबरोबरच या भागातील फुरसुंगी, देवाची उरुळी, भेकराईनगर येथील 85 कोटींची पाणी योजना मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी पुणे महापालिकेने परवानगी दिली आहे. तसेच, संरक्षण विभागाच्या हद्दीतून ही जलवाहिनी जाण्यासाठी ना हरकत परवानगी दिल्याने फेब्रुवारीपर्यंत योजनेचे पाणी येथील नागरिकांना मिळणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com