governor, Ajit Pawar and Devendra Fadnavis in Pune on the same day | Sarkarnama

राज्यपाल कोश्यारी, अजितदादा आणि फडणवीस एकाच दिवशी पुण्यात

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

राज्याच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती पुण्यात एकाच दिवशी असल्याने त्याची चर्चा होणे स्वाभाविक होते. 

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तिघेही आज पुण्यात होते. यात राज्यपाल आणि पवार यांची स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली. फडणवीस हे वेगळ्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते.

या तिघांनी 23 नोव्हेंबर रोजी पहाटे एकत्र येऊन महाराष्ट्राला राजकीय धक्का दिला होता. त्याची आठवण आज पुण्यातील राजकीय कार्यकर्त्यांना या तिघांच्या एकाच दिवशी पुण्यात असल्याने झाली. त्यात राष्ट्रवादीत पार्थ पवारांमुळे राजकीय वातावरण गरमागरमीचे असल्याने त्याविषयीची चर्चा पुण्यातील वर्तुळात होतीच.

स्वातंत्र्यदिनानिमित्तचा शासकीय कार्यक्रम पुण्यातील पोलिस संचलन मैदानावर राज्यपालांच्या हस्ते पार पडला. राज्यपालांनी या वेळी अजितदादांची आपल्या मिश्लिक स्वभावानुसार फिरकी घेतली. तुमच्या भागात तुमच्या परवानगीविना आलो आहे, असे गाडीतून उतरत राज्यपालांनी दादांना सांगितले. दादांनी त्यावर हात जोडून त्यांचे स्वागत केले. 

अजित पवार हे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संपवून आज बारामतीत जाणार होते. तेथे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे विविध नातेवाईकांना भेटणार होते. त्यात अजित पवारही सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र अजितदादा हे पुण्यातच थांबल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकट्या पार्थ यांनी आपले काका श्रीनिवास पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. अजितदादा आणि पार्थ या दोघांनीही या विषयावर माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

दुसरीकडे फडणवीस हे पुणे महापालिका, रा. स्व. संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. या वेळी खासदार गिरिश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. फडणवीस यांनी या वेळी राजकीय टिप्पणी काही केली नाही.

देशातील कोरोना रूग्णसंख्येत महाराष्ट्र 24 टक्के देशातील कोरोना मृत्यूसंख्येत महाराष्ट्र 41 टक्के सातत्याने 18 ते 19 टक्के संसर्गाचे प्रमाण हे दररोज आहे. ही परिस्थिती पाहता अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज, असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा आपण सातत्याने आग्रह धरला. आता त्या वाढविण्यात आल्या, पण अँटीजेनवर अधिक भर दिला जात आहे. त्याही चाचण्या करायला हव्या. पण, मुख्य भर हा आरटी-पीसीआरवर असला पाहिजे. जंबो सेंटरऐवजी छोटी छोटी सेंटर्स उभारली पाहिजे. ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोपी असतात. चाचण्यांची संख्या मात्र सातत्याने वाढविली पाहिजे. आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमतावृद्धी केली पाहिजे. यातूनच कोरोनावर लवकर मात करणे शक्य होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख