Going to prepare for the competition exam Student positive | Sarkarnama

स्पर्धा परीक्षेच्या तयारीला गेलेला 'तो' पॅाझिटिव्ह निघाला..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 27 मे 2020

मांडवगण फराटा येथे आठ दिवसांपूर्वी दिल्ली येथून आलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.

मांडवगण फराटा : सनदी अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न.. अभ्यासासाठी त्याने दिल्ली गाठली. पण कोरोनामुळे परत तो आपल्या गावी आला. अन् काही दिवसात त्याला कोरोना झाल्याचे तपासणीत उघड झाले. मांडवगण फराटा ( ता. शिरुर ) येथील विद्यार्थ्याबाबत हा प्रकार घडला. 

मांडवगण फराटा ( ता. शिरुर ) येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे आठ दिवसांपूर्वी दिल्ली येथून आलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली. 

मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी याबाबत माहिती दिली. मांडवगण फराटा येथील कोरोना संसर्ग झालेला विद्यार्थी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची ( UPSC ) तयारी करण्यासाठी गेलेला होता. केंद्र सरकारने एका विशेष रेल्वेने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गावी पाठविले होते. या विद्यार्थ्यांच्या बरोबर हा विद्यार्थी आला होता. ता. १९ मे रोजी घरी आल्यावर त्याला ताप, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. अशातच त्याच्या बरोबर आलेल्या कोल्हापूर येथील मित्राची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली आहे. त्या मित्राने फोनवरून ही माहिती दिली होती. त्यामुळे या विद्यार्थ्याला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. 

 

मांडवगणच्या सर्व सीमा बंद

या तरुणाला ताप व थोडा घसा दुखत असल्याने त्याला हडपसर येथील एका रूग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याची कोराना टेस्ट केल्यानंतर करोना संसर्गाची लक्षणे दिसून आली होती. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. या तरुणाला पुढील उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेले नातेवाईक, मित्र यांना होम क्वारंटाइन केले  आहे. सर्वांच्या आरोग्याकडे आरोग्य अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. येथे लॉकडाउन असतानाही नागरिक गंभीर नव्हते. परंतु आता मात्र सर्व नागरिक हादरले आहेत. महसूल विभागाने मांडवगणच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. 

 

 

रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण पाच दिवसांवरून १४ दिवसांवर  

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत असले तरी रोज वाढवण्यात आलेल्या टेस्टमुळे ही संख्या वाढल्याचे दिसत आहे. कोरोनाची लागण झालेल्या एकूण रूग्णांपैकी ८० टक्के रूग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दोन महिन्यात पाच दिवसांवरून १४ दिवसांपर्यंत नेण्यात यश आले असून कोरोनाचा मुकाबला करताना हे सर्वात मोठे यश असल्याचे मेहता यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी पाच दिवसात रूग्णांची संख्या दुप्पट होत होती. मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत अशादायी आहे.

तज्ञांच्या सल्ल्याने सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे पाच दिवसात रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण आता चौदा दिवसांवर गेले आहे. गेल्या दोन महिन्यातील कोरोनाविरूद्धच्या संघर्षातील हे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यूदर रोखण्यातही चांगले यश मिळाले आहे. दोन महिन्याच्या काळात असलेला साडेसात टक्के मृत्यूदर ३.२ वर आणण्यात यश मिळाले आहे. राज्य पातळीवर अकरा तज्ञ डॉक्टरांचा टास्कफोर्स नेमण्यात आला असून त्यांनी केलेल्या अभ्यास आणि निरीक्षणातून उपाययोजना करण्यात आल्या. त्याला मोठे यश मिळाले असून मृत्यूदर कमी होण्यामागे या तज्ञ डॉक्टरांची मोठी मदत झाल्याचे मेहता यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख