सुनेला छळणारे गायकवाड कुटुंबीय निघाले लॅंड माफिया    - The Gaikwad family has been Case file  in several police stations-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

सुनेला छळणारे गायकवाड कुटुंबीय निघाले लॅंड माफिया   

पांडुरंग सरोदे 
बुधवार, 21 जुलै 2021

फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरविण्याच्या वापरासाठी घेतलेली जागाही बळकाविण्याचा प्रयत्न गायकवाड कुटुंबाने केला आहे

पुणे : कौटुंबिक छळाप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या औंध येथील गायकवाड कुटुंबीयांकडून शिवीगाळ, मारहाण, खंडणीबरोबरच शेतकरी, बांधकाम व्यावसायिकांच्या जमिनींवर बेकायदेशीरपणे ताबा करुन जमिनी लाटण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार पोलिस ठाण्यात गायकवाड कुटुंबाविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरविण्याच्या वापरासाठी घेतलेली जागाही बळकाविण्याचा प्रयत्न गायकवाड कुटुंबाने केला आहे. (The Gaikwad family has been Case file  in several police stations) 

औंध येथील नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा केदार ऊर्फ गणेश गायकवाड, जावई दीपक गवारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सुनेचा छळ केल्याप्रकरणी काही दिवसांपुर्वीच चतुःशृंगी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सुनेचा अमानुषपणे छळ करुन गणेश गायकवाड हा आमदार, मंत्री होऊ शकत नाही, असे सांगणाऱ्या उच्चभ्रु अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल याच्या सांगण्यावरुन तिच्यावरुन लिंबू ओवाळून टाकण्याचा प्रकार केला होता. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल गुरूजीला अटकही केली होती. दरम्यान, कौटुंबिक छळाच्या प्रकरणानंतर याच गायकवाड कुटुंबीयांचे कारनामे पुढे येऊ लागले आहेत.

हेही वाचा : गणेश नाईकांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दमबाजी

नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा केदार ऊर्फ गणेश, जावई दिपक गवारे यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक नागरीकांच्या जमीनींवर बेकायदेशीरपणे ताबा मारण्याचे प्रकार पुढे आले आहेत. नागरीकांच्या जमीनींवर ताबे मारून, त्यांच्याकडे जमीनीची मागणी करणे किंवा खंडणी मागण्याचे प्रकार संबंधितांनी केले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता विकत घेतलेल्या जमीनींचे पैसे परत न करता, संबंधीत व्यक्तींना गोळ्या घालून मारण्याचे आणि कोट्यावधी रुपयांची खंडणी मागण्याचेही प्रकार नानासाहेब, गणेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी केल्याची माहिती पुढे आली आहे. अनेक नागरीक केवळ जीवाच्या भितीने पोलिसांकडे जाण्यास टाळत होते. मात्र सुनेबाबत घडलेल्या प्रकरणानंतर गायकवाड कुटुंबीयांच्या गुन्ह्यांची मालिका पुढे आली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी, चंदननगर, सांगवी, हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
   
पिंपळे निलखमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या जमीनीवर बेकायदेशीरपणे ताबा

केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड, नानासाहेब गायकवाड, गणेश साठे यांच्यासह सात जणांविरुद्ध 24 जुन 2021 रोजी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अजिंक्‍य विठ्ठल काळभोर (वय 45, रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधका व्यावसायिक आहेत. पिंपळे निलख येथे फिर्यादीच्या वडीलांची मिळकत होती. मिळकतीच्या संरक्षणासाठी फिर्यादीने तारेचे कुंपण घातले होते. त्यांच्या मिळकती शेजारीच नानासाहेब गायकवाड यांचीही मिळकत असल्याने फिर्यादीची त्यांच्याशी ओळख होती. फिर्यादीने त्यांच्या जागेवर 2019 बांधकाम सुरू केले. त्यावेळी नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, गणेश साठे व अन्य पाच ते सहा व्यक्तींनी फिर्यादीची जागेचा बेकायदेशीरपणे ताबा मिळविण्यासाठी फिर्यादीस दमदाटी, शिवीगाळ केली. तसेच वेळोवेळी फिर्यादीच्या कामगार, ठेकदारांनाही मारहाण करून तेथे येण्यास मज्जाव केला. तसेच फिर्यादी गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या जागेतील बांधकाम साहित्य, पाण्याच्या टाक्‍या जबरदस्तीने काढून नेल्या.

लोहगावमध्येही अतिक्रमण करीत जमीन लाटण्याचा डाव

गणेश नाना गायकवाड, सोनाली गवारे, दिपक गवारे यांच्यासह पाच जणांविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात बेकायदेशीरपणे जमीन बळकाविल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी प्रितम प्रताप खांदवे (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मंगल कार्यालय व्यावसायिक असून त्यांची लोहगावमध्ये वडीलोपार्जीत शेतजमीन आहे. त्याच्या शेजारीच खराडीतील दिपक व सोनाली गवारे यांचीही जमीन आहे. 15 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादीच्या जमिनीवर काहीजण बेकायदेशीरपणे पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण करीत होते. त्यावेळी फिर्यादीने तेथे जाऊन आमच्या जागेत कोणीही अतिक्रमण करायचे नाही, असे म्हंटले. तेव्हा गणेश गायकवाड याने फिर्यादीस शिवीगाळ करीत "हि जागा माझ्या बहिणीची आहे. माझी बहिण सोनाली व दाजी दिपक गवारे यांना त्रास झाल्यास हातपाय तोडून टाकीन,'' अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टर उतरविण्याच्या बहाण्यानेही लाटली जमीन

बांधकाम व्यावसायिक विजय कुलकर्णी व त्यांच्या भागीदारांनी विकसन करण्यासाठी सूस येथे जमीन घेतली होती. 2017 मध्ये त्यांच्या शेजारील जागामालक नानासाहेब गायकवाड याने फिर्यादीकडे "आमच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी येणार आहे. त्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तुमची जागा वापरण्यास द्यावी' अशी मागणी केली. त्यानंतर त्यांचा मुलगा गणेश गायवाड याने जमीन बेकायदेशीरपणे बळकाविण्याच्या उद्देशाने झाडे लावून अनधिकृतपणे पत्र्याचे कुंपण घातले. तेथे टॉवर उभा केला. तसेच फिर्यादीच्या जमीन ट्रॅक्‍टरद्वारे नांगरण्याचा प्रयत्न केला, त्यास विरोध दर्शविल्यानंतर त्यांनी संबंधित जागा आम्हाला विका किंवा त्याबदल्यात दुसरीकडे जागा देतो, असे धमकाविले. याबरोबरच त्यांनी जागेच्या बनावट नकाशेही तयार केले.

हेही वाचा : फडणवीसांची कबुली; निवडणूक निकालानंतर अधिकारी इस्त्राईलला गेले पण...

जमीन खरेदीचे पैसे देण्याऐवजी गोळ्या घालण्याची धमकी

सौरभ भगवान बालवडकर हे खडी पुरवठादार आहेत. त्यांच्या वडीलांची बालेवाडी येथे वडीलोपार्जित जमीन होती. त्यांची व नानासाहेब गायकवाड याची ओळख होती. त्यातुनच गायकवाड याने फिर्यादीच्या वडीलांची तीन लाख रुपये गुंठ्याने जमीन घेण्याचे ठरविले. त्यानुसार काही रक्कम देऊन उर्वरीत रक्कम नंतर देतो, असे सांगून खरेदीखतही केले. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय गायकवाड कुटुंबीयांकडे उर्वरीत रकमेसाठी पाठपुरावा करीत होते. त्यावेळी गायकवाड कुटुंबीय व दिपक गवारे याने शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच नानासाहेब गायकवाड याने त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तर गणेश गायकवाडने जमीन पाहीजे असल्यास दोन कोटी रुपये द्या, नाहीतर गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यामुळे बालवडकर यांनी नानासाहेब गायकवाड, केदार ऊर्फ गणेश गायकवाड व दिपक गवारे यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख