शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा इशारा : ... तर मी नंगानाच करेन!

पुरंदर विमानतळाची जागा बदलण्यास शिवतारेंचा कडाडून विरोध
vijay-shivtare-
vijay-shivtare-

सासवड : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे गेले काही दिवस आक्रमक झाले असून पुरंदर विमानतळाच्या मुद्यावरून गेल्या आठवड्यात शरद पवार यांना पत्र लिहिल्यानंतर त्यांनी आज पुन्हा या प्रश्नी इशारा दिला.  

पुरंदरच्या सर्वांगीण विकासासाठी आणलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ जर कोणी दुसऱयाच्या भल्यासाठी दुसऱया जागेत नेले तर मी प्रसंगी नंगा नाच करेन, असा जोरदार इशारा त्यांनी दिला. गुंजवणी प्रकल्पासाठी मी माझ्या किडन्या घालविल्या. विमानतळासाठी प्राण पणाला लावेल, अशी भाषा त्यांनी वापरली. तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी जागे व्हावे. विमानतळासाठी आधी निश्चित केलेल्या जागेचा मोबदला जाहीर करावा.  मी शेतकऱयांची माफी मागतो, पण कुणी पुढच्या पिढींचा विकास हिराऊन घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
 
शिवतारे यांच्या हस्ते तालुक्यातील शिवसेनेच्या ३० सरपंच, ३४ उपसरपंच आणि शेकडो सदस्यांचा सत्कार समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.  पुरंदर विमानतळासाठी नव्याने सुचविण्यात आलेल्या राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, मावडी, पिंपरी या गावांत विमानतळ करण्यास शिवतारे यांनी स्पष्ट विरोध दर्शविला.

शेतकरी आणि वारकऱ्यांनी उजनी धरणाला मोठा विरोध केला होता. यशवंतराव चव्हाण भूमिपूजन करण्याआधी थेट पांडुरंगाच्या दारात गेले. पांडुरंगाची माफी मागितली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच तुझी चंद्रभागा अडवत असल्याचे पांडुरंगाला सांगितले. मी सुद्धा आज पुरंदरच्या त्या पहिल्या जागेतील शेतकऱ्यांची माफी मागतो. पण विमानतळ हे आपल्याच भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी महत्वाचे आहे. पारगाव वगळून जुन्याच ठिकाणी विमानतळ व्हावे ही गरज व लोकभावना आहे. नवीन जागेत विमानतळ गेल्यास त्याचा फायदा आपल्या तालुक्याला होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

गुंजवणीच्या पाण्यावरूनही त्यांनी आक्रमक भाषा वापरली. हे पाणी आता कुणी रोखू शकत नाही. पाईपलाईनचं काम सुरू आहे. वांगणी, वाजेघर आणि शिवगंगा खोऱ्यातील गावांनाही पाणी मिळणार असून मी स्वतः या साऱया बाबी कानावर घालण्यसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विमानतळाच्या प्रश्नावरून विद्यमान आमदार संजय जगताप आणि शिवतारे यांच्यात जोरदार वाद सुरू आहे.  संजय जगताप यांचे नाव न घेता शिवतारे म्हणाले की कोविडच्या अडचणीमुळे तुम्हाला निधी मिळत नाही, असे सांगितले जाते. मग बारामती, इंदापूरला हा निधी कसा मिळतो? मी मंजूर करुन आणलेलीच कामे तुम्हाला पुरतील. एक नया पैसा देखील हे सव्वा वर्षात आणू शकले नाहीत. मी आणलेले प्रकल्प अडविण्यापेक्षा तुमचा एखादा प्रकल्प आणा. तुम्ही एकटे या अन् मी एकटा येतो, पराभव कोणाचा होतो ते बघा. माझी तर पालखीतळावर आता एका व्यासपीठावर येण्याची तयारी आहे, असे आव्हान त्यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com