पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पवार यांचे निधन  - Former member of Purandar Panchayat Samiti Shivaji Pawar passed away | Politics Marathi News - Sarkarnama

पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पवार यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पवार यांचे आज  निधन झाले.

वाल्हे : पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी मंत्री विजय शिवतारे यांचे तालुक्यातील शिवसेनेचे शिलेदार शिवाजीराव पवार यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या शालिनी पवार यांचे ते पती होत.  

वाल्हे (ता. पुरंदर) येथील श्री. काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या शिवाजीराव पवार यांनी सन १९९२ ते १९९७ या काळात पुरंदर पंचायत समितीचे सदस्य पद भूषविले होते. मुंबई येथील पुरंदर पतपेढीच्या संचालक पदाची देखील जबाबदारी त्यांनी पेलली होती. वाल्हेचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी मंदिराच्या विकासासाठी अविरत प्रयत्न केले होते. गेल्या काही वर्षांपासून तब्बेत साथ देत नसल्याने त्यांनी त्यांच्या पत्नी शालिनी पवार यांना राजकारणात सक्रिय केले होते. त्या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत. पवार यांच्या मागे पत्नी शालिनी पवार, मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील उद्योजक केदार पवार हे त्यांचे पुत्र होत. 

तुळजाभवानी महिला बचत गटाच्या सचिव उषा पवार व विपला पवार या त्यांच्या स्नुषा होत. तर अमर तरुण मंडळाचे युवा सदस्य अथर्व पवार हे त्यांचे नातू होत. पवार यांच्या एका मुलाचे एक वर्षांपूर्वीच ऐन उमेदीत निधन झाले होते. आता एक वर्षात शिवाजीराव गेल्याने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
    
शिवाजीराव यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेना प्रवेशामुळे तालुक्यात जेजुरी-वाल्हे-नीरा या पट्ट्यात शिवसेनेला संजीवनी मिळाली होती. प्रवेशानंतर पहिल्याच निवडणुकीत पत्नीस जिल्हा परिषद निवडणुकीत एकहाती विजय मिळवून दिला होता. त्यानंतर गेली पाच वर्ष शिवतारे यांचे अत्यंत विश्वासू नेते बनले होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. तर वाल्हे गावकऱ्यांचेही धार्मिक, सामाजिक व राजकिय आधार तुटला आहे. वाल्हे नजीक आडाचीवाडी ग्रामपंचायतीवर त्यांची एकहाती सत्ता होती. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे याना ती ग्रामपंचायत घेता आली नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख