बारामती माजी नगराध्यक्षांच्या आई वडीलांचा एकाच दिवशी मृत्यू... - Former Mayor of Baramati Sandhya Bobade parents die  | Politics Marathi News - Sarkarnama

बारामती माजी नगराध्यक्षांच्या आई वडीलांचा एकाच दिवशी मृत्यू...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

बारामतीच्या माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला.

बारामती : कोरोनाच्या संकटाने अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. बघता बघता माणस निघून जाताना पाहून अनेकांना तणाव सहन होईनासा झाला आहे. बारामतीच्या माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे यांच्यावरही काल असाच दुःखाचा डोंगर कोसळला.

काल संध्या बोबडे यांचे व़डील शांताराम शिंदे (वय 89 ) व आई पुष्पावती शिंदे (वय 80) यांचे अगदी काही तासांच्या अंतराने निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातून थोड अंग दुखतय म्हणून विश्रांतीसाठी मुलीकडे म्हणजेच संध्या बोबडे यांच्याकडे ते आले होते. 

दवाखान्यात नेल्यानंतर दोघांच्याही तपासण्या करुन घेण्याचे डॉ. सतीश बोबडे यांनी ठरविले. ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु झाले. बारामतीतीलच एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. काही काळ त्यांनी उपचाराला साथही दिली पण काल मात्र प्रारंभी शांताराम शिंदे यांची प्रकृती खालावली व त्यांची प्राणज्योत मालविली. काही तासातच पुष्पावती यांनीही आपला प्राण सोडला. 

मात्र पतीचे निधन झाल्याचे पुष्पावती यांना कोणीही सांगितलेले नव्हते, त्यांची तब्येत थोडी चिंताजनक असल्याचेच त्यांना सांगितले गेले. मात्र आयुष्यभर साथ सोबत केलेल्या पुष्पावतीही आपल्या पतीसोबतच कायमच्या निघून गेल्या. शांताराम शिंदे मातीपरिक्षण अधिकारी होते, नोकरीच्या निमित्ताने राज्यातील विविध शहरात त्यांनी काम केलेले होते. बारामतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा संध्या बोबडे या त्यांच्या कन्या. एकाच दिवशी आई वडीलांच्या मृत्यूने बोबडे कुटुंबियांवर प्रचंड आघात झाला. 
  
हेही वाचा : खासदार सुळेंनी टि्वट केलं अन् जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले दौंडमधील यात्रेकरु झाले मार्गस्थ... 

दौंड : जम्मू काश्मीर येथे सहलीसाठी जाऊन अडकलेल्या दौंड तालुक्यातील ३१ जणांच्या यात्रेकरू गटाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने पुढील प्रवास करणे शक्य झाले. यात पाटस येथील डॉ. विकास वैद्य यांचे संपूर्ण कुटुंबीय तसेच अन्य सहकारी असून दहा ते अकरा महिलांसह बहुतांश सगळे साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक आहेत. परक्या मुलुखात अडकून पडल्यामुळे डॉ. वैद्य यांनी खासदार सुळे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ही बाब कळवली. त्यानुसार लागलीच सर्व सूत्रे हलली. सुळे यांनी ट्विट करून तेथील प्रशासकीय अधिकारी आणि अन्य वरिष्ठ यंत्रणांना याबाबत सहकार्य करण्यास सांगितले. तेथील अधिकाऱ्यांनीही विलंब न लावता आवश्यक त्या कागदोपत्री पूर्तता करून घेत सर्व यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार सर्वजण मार्गस्थ झाले असून वैष्णोदेवीचे दर्शन झाल्यावर आम्ही महाराष्ट्रात येण्यास परत निघू, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख