पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे निधन  - Former Chairman of Pune District Bank Shivajirao Bhosale passed away | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे निधन 

संतोष शेंडकर 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे 1962 पासूनचे ते घनिष्ठ मित्र होते. 

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव यशवंतराव भोसले (वय 81) यांचे आज (ता. 30 ऑक्‍टोबर) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. बारामती तालुक्‍यातील वाणेवाडी येथील ते रहिवासी होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे 1962 पासूनचे ते घनिष्ठ मित्र होते. 

भोसले हे 1992 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकरी बॅंकेचे अध्यक्ष झाले. सन 1972 च्या दुष्काळावेळी ते बारामती पंचायत समितीचे सभापती होते. याशिवाय जिल्हा परिषद सदस्य, सोमेश्वर कारखान्याचे  संचालक, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, यशवंतराव सोसायटीचे संस्थापक अशी पदेही त्यांनी सांभाळली.

उद्योजक रमेश भोसले व प्रवीण भोसले हे त्यांचे पुत्र, तर पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे हे त्यांचे जावई होत. 

ते 1962 पासून शरद पवार, शारदाबाई पवार यांचे विश्वासू होते. सोमेश्वर कारखान्याचे 1992 मध्ये काकडे गटाकडून पवार गटाकडे झालेल्या हस्तांतरात त्यांचा सहभाग होता. अलीकडेसुद्धा सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात त्यांचा दबदबा होता. कारखान्याचे राजकारण फिरविण्याची त्यांची ताकद होती. कारखान्याच्या वार्षिक सभांमध्ये सत्ताधारी-विरोधक यांच्यात वाद झाल्यास अनेकदा भोसले यांचा शब्द अंतिम मानला जात होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख