तमाशा फडमालक, कलावंतांच्या मदतीसाठी बेनके परिवाराकडून मदतीचा हात... - Five lakh rupees from the Benke family to help the Tamasha artist | Politics Marathi News - Sarkarnama

तमाशा फडमालक, कलावंतांच्या मदतीसाठी बेनके परिवाराकडून मदतीचा हात...

रवींद्र पाटे
गुरुवार, 8 एप्रिल 2021

तमाशा कलावंताच्या मदतीसाठी माजी आमदार वल्लभ बेनके परिवार पुढे सरसावला आहे.

नारायणगाव  : पारंपरिक तमाशा कला ही राज्याची शान आहे. कोरोना संकटामुळे राज्यातील तमाशा फडमालक व कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संकटामुळे सलग दोन हंगामात तमाशाचे खेळ न झाल्याने तमाशा फडमालक व कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत.  

या तमाशा कलावंताच्या मदतीसाठी माजी आमदार वल्लभ बेनके परिवार पुढे सरसावला आहे. त्यांनी तमाशा कलावंत, फडमालक यांची बैठक घेतली. यात बेनके परिवाराकडून पाच लाख रूपयांची मदत करण्यात आली.  या वेळी तमाशा पंढरीचे अध्यक्ष आविष्कार मूळे, फड मालक मोहित सावंत,संभाजी जाधव, भाऊ देवाडे, सूरज वाजगे आदी उपस्थित होते.

 
गावोगावचे यात्रा कमिटीचे सदस्य,विविध संस्था व सर्व पक्षीय नेत्यांनी तमाशा फडमालक व कलावंत यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.  तमाशा पंढरी नारायणगाव येथे आज दुपारी आमदार बेनके व प्रमुख फडमालक यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार वल्लभ बेनके परिवाराच्या वतीने पाच लाख रुपयांच्या मदतिचा धनादेश आमदार बेनके यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्याकडे देण्यात आला. 

 

आमदार अतुल बेनके म्हणाले, ''अतिशय प्रतिकूल परिस्थितीत फडमालक व कलावंत राज्याची लोककला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. कोरोना संकटामुळे सलग दोन हंगामात तमाशाचे खेळ न झाल्याने तमाशा फडमालक व कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. फडमालक व कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा फडमालक व कलावंत हे समाज प्रबोधनाचे काम करतात. कला हेच त्यांचे भांडवल आहे. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. ज्या तमाशा कलावंतांनी आपले दुःख बाजूला ठेवून कलेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला हसवण्याचे काम केले त्यांच्यावर आता रडण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची लोककला जीवंत ठेवण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत करावी.'' 

तमाशा फडमालक व कलावंत यांच्या मदतीसाठी  बँक ऑफ महाराष्ट्र च्या नारायणगाव शाखेत ६०३८४०६९०३६ या खाते क्रमांकावर मदत निधी जमा करावा.असे आवाहन खेडकर यांनी केले आहे.

माजी आमदार वल्लभ बेनके यांनी नेहमीच तमाशा फडमालक व कलावंत यांना मदत केली  आहे. आमदार अतुल बेनके यांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. अडचणीच्या काळात त्यांनी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. हे उपकार राज्यातील फडमालक व कलावंत  कधीही विसरणार नाहीत.

रघुवीर खेडकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळ 

Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख