सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उजळली बावधने वस्ती...गुढी उभारून स्वागत.. - first time since independence electricity provided Bavdhane Vasti Supriya Sule | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उजळली बावधने वस्ती...गुढी उभारून स्वागत..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरात वीज मिळाली

पुणे : मुळशी तालुक्यातील लव्हार्डे गावाजवळ दुर्गम भागात असलेल्या बावधने वस्तीवर वीज पोहोचली आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. सुळे यांच्या सुचनेनुसार या वस्तीवर आज महावितरणची वीज पोहोचताच ग्रामस्थांनी गुढी उभारून आनंद व्यक्त केला. 

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या घरात वीज मिळाली आहे. सहा दिवसात दोन किलोमीटर वीजवाहिन्या टाकून या वस्तीतील अंधार दुर झाला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, महावितरणचे मुळशी उपविभागीय अभियंता फुलचंद फड यांच्यासह सुहास दगडे, शंकर धिंडले, माणिक गायकवाड, नितीन भोईटे, रवी शेंडे, जगदीश धर्माधिकारी, नथू बावधने, समीर बावधने, महावितरणचे कर्मचारी तानाजी पाडोळे, दत्ता हरपुडे, भास्कर फड आदी यावेळी उपस्थित होते.

वस्तीवर वीज पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने ग्रामस्थांना लाडू आणि पेढे वाटून त्यांचा आनंद आणखी द्विगुणित करण्यात आला.दोन महिन्यांपूर्वी सुळे यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान या वस्तीला भेट दिली होती. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्याकडे वीज पुरवठ्याबाबत मागणी केली होती. याची दखल घेत त्यांनी लागलीच महावितरणच्या मुळशी विभागाकडे या विषयाचा पाठपुरावा केला, तातडीने येथे वीजपुरवठा करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

महावितरणचे खांब बसविण्यात आले. आठ दिवसात ते काम पूर्ण होऊन आज वीज पोहोचली. वस्तीवर प्रकाश आल्याचा आनंद समस्त ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता. सगळ्यांनी टाळ्या आणि आरोळ्याच्या गजरात विजेचे स्वागत केलेच शिवाय गुढी उभारत सुप्रिया सुळे यांचे भरभरून आभार मानले.
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख