MIT कडे तीस लाखांची खंडणी मागितल्याबद्दल माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा - FIR against ex Alandi corporator for extortion of Rs 30 lakh | Politics Marathi News - Sarkarnama

MIT कडे तीस लाखांची खंडणी मागितल्याबद्दल माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

लोणी काळभोर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

लोणी काळभोर (पुणे) : आळंदी देवाची (ता. खेड) परीसरातील एमआयटी शिक्षण संस्थेच्या जागेवरील आरक्षणा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेला खटला मागे घेण्याच्या बदल्यात संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड यांना तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आळंदीचे माजी नगरसेवक डी. डी. भोसले ऊर्फ ज्ञानेश्वर दगडू भोसले (रा. आळंदी देवाची ता. खेड)  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भोसले हे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी असल्याचेही त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर नमूद केले आहे. 

या प्रकरणी एमआयटी आर्ट, डिझाईन अॅन्ड टेक्नालॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश तुळशीराम कराड ( वय-54, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. खंडणी मागण्याचा वरील प्रकार चोविस महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथील एमआयटी शिक्षण संस्थेच्या आवारात घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी देवाची शहर परीसरात श्री क्षेत्र आळंदी - देहु परिसर विकास समितीच्या माध्यमातुन वारकरी भाविक भक्तांसाठी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यासाठी मागील काही वर्षांपासून विकासकामे सुरु आहेत. विश्वरूप दर्शन मंचाच्या मागील बाजुला (चोवीसावाडी ता. खेड) हद्दीत शासनाची ५० गुंठे जागा आहे. सदर जागेमध्ये एमआयटी शिक्षण संस्थेने श्री क्षेत्र आळंदी - देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे सुरु केली होती. मात्र या जागेवर आरक्षण असल्याच्या कारणावरुन भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

दरम्यान मंगेश कराड व एमआयटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाचे संचालक कर्नल विलास तांदळे, राजबाग कॅम्पस मॅनेजर दिलीप पाटील व कृष्णा पवार असे चार जण २३ ऑगष्ट २०१८ रोजी दुपारी एमआयटी शिक्षण संस्थेत उभारल्या गेलेल्या डोमच्या समोर चर्चा करीत असतांना, ज्ञानेश्वर भोसले अचानक त्या ठिकाणी आले.  भोसले यांनी मंगेश कराड यांच्याकडे वरील खटला मागे घेण्याच्या बदल्यात, तीस लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तब्बल चोवीस महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर करत आहेत. 

खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल बोलतांना मंगेश कराड म्हणाले,  भोसले यांनी खंडणी मागितली त्या दिवशीच, म्हणजे २३ ऑगष्ट २०१८ रोजी आळंदी येथील माईर्स एमआयटी व विश्वशांती केंद्रांचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे खंडणीची लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र वरील विषया संदर्भात चोवीस महिन्यांनंतरही काहीही कारवाई न झाल्याने, अखेर लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करावा लागला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख