पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता   - Famous Pune businessman Gautam Pashankar goes missing | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता  

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

पोलिसांकडून तपास सुरू...

पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व बांधकाम व्यावसायिक गौतम विश्‍वानंद पाषाणकर (वय 65) हे बुधवारी सायंकाळी साडे चार वाजल्यापासून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळील मोदीबागेमध्ये राहतात. बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. तेथून ते दुपारी चार वाजता जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार चालकाला पानशेत येथे एका कामानिमित्त पाठविले. त्यानंतर गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले. तेथून ते बेपत्ता झाले.

दरम्यान, कारचालकाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चालकाने याबाबत पाषाणकर यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांना हि माहिती दिली. त्यानंतर पाषाणकर कुटुंबीयांनी त्यांचा तत्काळ शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मुलाळे करीत आहेत. गौतम पाषाणकर कोणाला आढळल्यास त्यांनी कपिल पाषाणकर ( मोबाईल क्रमांक 9822474747) किंवा शिवाजीनगर पोलिस ठाणे (020-25536263) यांच्याशी संपर्क साधावा. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख