रेमडेसिविर, पीपीई कीट, सॅनिटायझरवरील GST माफ करण्याची मागणी - Excuse GST on Remedicivir, PPE Insect, Sanitizer! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

रेमडेसिविर, पीपीई कीट, सॅनिटायझरवरील GST माफ करण्याची मागणी

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 एप्रिल 2021

देशभरात आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडेही विक्रमी पातळीवर पोचले आहेत.

पुणे : देशभरात आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडेही विक्रमी पातळीवर पोचले आहेत. हजारो रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. या उपचारांमध्ये रेमडेसिविर, पीपीई कीट यांचा समावेश आहे ज्याचा आर्थिक ताण रूग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने या औषधांवरील जीएसटी कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सजग नागरिक मंच पुणेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 

त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये वेलणकर म्हणाले, कोरोनाच्या दुसर्या लाटेने अवघ्या देशात आणी विशेषतः महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने उपचारांचा खर्च कमी होण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

कोरोना नियंत्रणासाठी पावले उचला सोनिया गांधी यांच्या काँग्रेसशासित राज्यांना सूचना

रेमडेसिविरचा इंजेक्शन वर १२% तर  पीपीई कीट वर १८ % GST आकारला जातो. एवढेच नाही तर प्रत्येक सर्वसामान्य नागरीकाला वापराव्या लागणार्या सॅनिटायझर वरही १८% GST आकारला जातो. ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने सर्वसामान्य नागरीकाला दिलासा मिळावा म्हणून रेमडेसिविर, पीपीई कीट आणि सॅनिटायझरसह 'कोविड'शी संबंधित सर्व औषधे व साधने यावरील GST माफ करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या किमती त्याप्रमाणात कमी होतील.

आपणास विनंती आहे की आपण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री तसेच जीएसटी कौन्सिल (GST Counsil) या सर्वांकडे आग्रह धरावा आणि सामान्य माणसाला दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. 

दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सर्वसामान्य नागरिकांचे देशभरात हाल होत आहेत. पुरेसा साठा नसल्याने तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पण दुसरीकडे भाजप कार्यालयातच रेमडेसिविरचा साठा केला जात असल्याचे समोर आल्याने विरोधकांकडून भाजपवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. सोशल मीडियावरही भाजपला टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. 

लशीचे राजकारण : सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात अन् सर्वांत जास्त लशी भाजपच्या राज्यांना
 

भाजपच्या सूरतमधील कार्यालयातून रेमडेसिविर मोफत देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सुमारे पाच हजार इंजेक्शनचे वाटप केले जाणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी केली आहे. कार्यालयात इंजेक्शनच्या बॅाक्स, नागरिकांच्या कार्यालयाबाहेरील रांगेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सूरतमधील भाजप कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. इंजेक्शनसाठी डॅाक्टरांची चिठ्ठी आणि कोरोना रिपोर्ट असणे आवश्यक आहे.  

Edited By - Amol Jaybhaye
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख