जर हे नागपूरमध्ये घडले असते, तर मी बुलडोझरसमोर झोपलो असतो...  - Energy Minister Nitin Raut criticizes Pune Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

जर हे नागपूरमध्ये घडले असते, तर मी बुलडोझरसमोर झोपलो असतो... 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

हा दलित समाजावरील अन्याय आहे, या अन्याायविरोधात आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निश्चितपणे आम्ही सरकारकडे नोंदवणार.

पुणे : पुण्यातील (Pune) अंबिल ओढा परिसरातील वसाहतीमधील घरांवर मागील आठवड्यात महापालिकेडून कारवाई करण्यात आली. तेथील घटनास्थळाला मंगळवारी (ता. २९ जून) राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला. (Energy Minister Nitin Raut criticizes Pune Municipal Corporation)

हा दलित समाजावरील अन्याय आहे, या अन्याायविरोधात आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निश्चितपणे आम्ही सरकारकडे नोंदवणार. आंबिल ओढा परिसरात परवा भर पावसात ज्या पद्धतीने राक्षसी वृत्तीने, दंडेलशाहीने, या ठिकाणी या गरिबांची घरे तोडण्यात आली, उध्वस्त करण्यात आली. त्यांच्या घरातील सामान रस्त्यावर फेकण्यात आले. एवढच नव्हे तर महिलांना हात लावून, त्यांचे केस ओढण्यात आले. सर्व प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. तो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्य असा आहे, असे ते म्हणाले. 

हे ही वाचा : अनिल देशमुखांना अटक होईल; सर्व पुरावे EDच्या हाती

पहिली गोष्ट म्हणजे पावसाचे दिवस आहे. तुम्हाला कायदेशीर अधिकार प्राप्त असले, पावसामध्ये तुम्हाला कुणाच्या घराला हात लावता येत नाही, घरे तोडता येत नाही. संपूर्ण देशात कोरोना महामारी सुरू आहे. कोरोनाच्या दृष्टीने कायद्यात म्हटलेले आहे की सर्वांनी या ठिकाणी मास्क लावावा, सोशल डिस्टंस ठेवावा, हात धुवावे मग एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी अधिकाऱ्यांनी येऊन प्रशासनाने ही जी कारवाई केली. महापालिकेला लाज वाटली पाहिजे, खऱ्या अर्थाने तिथल्या महापौर, पदाधिकाऱ्यांना त्यांनी हे थांबवले नाही. त्यांच्या अधिकारानुसार ते थांबवू शकले असते, अशा शब्दात त्यांनी महापौर आणि पदाधिकाऱ्यांवर टीका केली.  

जर माझ्या नागपूरमध्ये हे घडले असते, तर मी त्या रोडरोलरच्या समोर लोळून हे थांबवले असते. परंतु एकानेही हे काम केले नाही. या घटनेचा निषेधच या ठिकाणी केला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. तसेच, मी या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यावर, मला रहावले नाही. मला वाटले माझ्या कुटुंबांवर हा अन्याय झाला आहे. मी सरकारमध्ये असताना जर हे होतोय, तर मी कसा स्वस्थ बसू? मी या ठिकाणी परिस्थिती पाहिली, काही महिलांच्या हातावर व्रण दिसून आले. हा निश्चतच दलित स्त्रियांचा अपमान करण्यात आला आहे. पुण्याच्या महापालिकेला, महपौर व पदाधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. दलितांवर मोठा अन्याय झाला आहे. या अन्याायविरोधात आम्ही लढणार आणि या लोकांना न्याय मिळवून द्यावा, ही मागणी निश्चितपणे आम्ही सरकारकडे नोंदवणार. असे राऊत यांनी सांगितले.

हे ही वाचा : शिवसेना आमदार सुहास कांदेंनी दिला चक्क आत्मदहनाचा इशारा

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशावरून कारवाई झाली अशी चर्चा आहे, असे विचारल्यानंतर राऊत म्हणाले, कारवाई दरम्यान महापौर झोपा काढत होते का? ते का पुढे आले नाही. त्यांनी बुलडोझर का थांबविला नाही. महापालिकेत सत्ता कोणाची आहे. असा सवाल उपस्थित करत भाजपवर टीका केली. मी देखील एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझ्याकडे देखील महापालिका आहे. महापालिकेला स्वायत्तता अधिकार असून ही कारवाई पालकमंत्र्यांनी केली की, अमुक माणसाने केली. ते चौकशीतून सर्व बाहेर येईल आणि मी कोणालाही वाचू इच्छित नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या कारवाई दरम्यान महिलांना ज्यांनी हात लावला, अशा सर्व जणांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 
 
Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख