बापरे; पुणे जिल्ह्यातील वीजबील थकबाकीने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा - Electricity bill arrears in Pune district crossed one thousand crore mark | Politics Marathi News - Sarkarnama

बापरे; पुणे जिल्ह्यातील वीजबील थकबाकीने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

एकट्या पुणे जिल्ह्यातच वीजबील थकबाकीने एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनापूर्वी ही थकबाकी केवळ 70 ते 80 कोटींपर्यंत होती. त्यामुळे थकबाकीदारांनी वीजबील भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

पुणे : लॉकडाऊन काळात वीजबील वसुली न झाल्याने महावितरणची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातच वीजबील थकबाकीने एक हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनापूर्वी ही थकबाकी केवळ 70 ते 80 कोटींपर्यंत होती. त्यामुळे थकबाकीदारांनी वीजबील भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

महावितरणने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पण त्यानंतरही महावितरणकडून हा निर्णय मागे घेण्यात आला नाही. मागील दहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील महावितरणच्या ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी तब्बल 803 कोटींनी वाढली आहे.

जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सुमारे 36 लाख 90 हजार ग्राहक आहेत. मार्च 2019 मध्ये 5 लाख 95 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे केवळ 62 कोटी 38 लाख रुपयांची थकबाकी होती. मार्च 2020 मध्ये 8 लाख 94 वीज ग्राहकांकडे 278 कोटींची थकबाकी होती. 

ही थकबाकी वसुल करण्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झाला. तेव्हापासून वीजबिल वसुलीवर मोठा परिणाम सुरु आहे. अनलॉकनंतरही थकीत व चालू वीजबिलांचा भरणा फारसा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या हलाखीची झाली आहे, अशी माहिती महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात 13 लाख 86 हजार वीजग्राहकांकडे तब्बल 1081 कोटी 41 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती 11 लाख 56 हजार 750 ग्राहकांकडे 635 कोटी 49 लाख, वाणिज्यिक 1 लाख 94 हजार 250 ग्राहकांकडे 295 कोटी 55 लाख तर औद्योगिक 27 हजार 970 ग्राहकांकडे 150 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी आहे.

ल्या डिसेंबर 2020 पर्यंत तब्बल 803 कोटींच्या थकबाकीचा डोंगर वाढला तरी महावितरणने कोणत्याही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. गेल्या 15 वर्षांमध्ये महावितरणकडून वीजटंचाईसह हानी, चोरी, वितरण यंत्रणेची दुरवस्था आदींवर प्रभावी उपाययोजना करून संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त करण्यात आले आहे.

कोरोनामुळे थकबाकीचे ओझे वाढल्याने आर्थिक स्थिती सध्या अतिशय हलाखीची झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख