मावळमधील हादऱ्याची जखम भाजपसाठी अद्याप भळभळती... - The election of Maval Vidhan Sabha between two activists of Rashtriya Swayamsevak Sangh is in full swing | Politics Marathi News - Sarkarnama

मावळमधील हादऱ्याची जखम भाजपसाठी अद्याप भळभळती...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

संघाच्या मुशीत तयार झालेले दोन कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध उभे राहिल्याने मावळ विधानसभेची निवडणूक चुरशीची ठरली होती

पुणे : भाजपचा बालेकिल्ला मावळात भाजपकडून राज्यमंत्री संजय भेगडे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून कधीकाळी त्यांचेच पक्षातील सहकारी आणि राष्ट्रवादीत नवखे असलेले तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक सुनील शेळके विधानसभेच्या आखाड्यात परस्परविरोधी शड्डू ठोकून उभे होते.
 
पूर्वाश्रमीचे भाजपाचे निष्ठावंत असलेले सुनिल शेळके विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलून भाजपाने बाळा भेगडे यांना हॅटट्रिकची संधी दिल्याने शेळके यांनी ऐनवेळेस राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ हाती बांधले. 

संघाच्या मुशीत तयार झालेले दोन कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध उभे राहिल्याने मावळ विधानसभेची निवडणूक चुरशीची ठरली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपचा बालेकिल्ला समजला जाणा-या मावळ मतदारसंघात हॅटट्रिकचे मनसुबे रचलेल्या माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना धोबीपछाड देत रेकॉर्डब्रेक मतांनी विजयश्री खेचून आणलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांच्या समर्थनार्थ कोण आला रे कोण आला ? मावळचा वाघ आला या घोषणांनी दुमदुमलेला नुतन महाराष्ट्र पाॅलिटेक्नीचा परिसर आणि भंडा-याने माखलेला तळेगाव-चाकण महामार्ग विधानसभा निवडणुकीच्या वर्षपुर्तीला आजही डोळ्यासमोर तरळतोय.

भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षप्रवेशापुर्वीच राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेले तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे तत्कालीन नगरसेवक सुनिल शेळके यांच्या अटीतटीच्या लढतीतीकडे अवघ्या पुणे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले होते. अगदी काहीच महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभूत केले होते. त्याच पार्श्वभूमीवर अवसान गळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीत नवखे असलेल्या सुनील शेळके यांच्या प्रचारादरम्यान मात्र अधिकच नवचैतन्य सळसळताना दिसत होते.

नुतन महाराष्ट्र पाॅलिटेक्नीकच्या आवारात चालू असलेल्या मतमोजणी दरम्यान सकाळी साडेनऊला पहिल्या फेरीत शेळके यांनी घेतलेली १८६७ मतांची आघाडी वाढत जाऊन शेवटच्या फेरीत ९३ हजार ९४२ अशा विक्रमी मताधिक्याने विजयी करुन गेली. दुपारी साडेबाराच्या सुमारास मतांच्या निर्णायक आघाडीद्वारे विजयाचा कौल मिळाल्यानंतर मतमोजणी केंद्रात आलेल्या सुनिल शेळके यांनी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन जल्लोष केला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच घासून चाललेल्या मतांच्या बेरजेत दुपारनंतर उर्वरीत मतदान केंद्रातून लिड तोडू न शकणारी आघाडी शेळके यांनी घेतली आणि मतमोजणी केंद्रात निकालाकडे लक्ष लावून बसलेल्या भेगडे समर्थकांनी तेथून काढता पाय घेतला. 

अनपेक्षित निकालाची कुणकुण लागल्याने का कुणास ठाऊक ? पण भेगडे यांनी आदल्या दिवशीपासूनच आपला फोन बंद ठेवला असावा. १ लाख ६७ हजार ७१२ मते घेणा-या शेळके यांनी भेगडे यांना आमदारकीच्या हॅटट्रिकपासून रोखले होते. तब्बल २५ वर्षे आमदारकी गाजवणा-या भाजपच्या बालेकिल्ल्यात शेळके यांच्या रुपाने राष्ट्रवादीने झेंडा रोवला. निवडणुकीअगोदर दोन तीन वर्षे समाज कार्यासाठी कंबर कसलेल्या शेळके यांना फलित म्हणून मिळालेल्या अनपेक्षित तितक्याच रेकॉर्डब्रेक मताधिक्याने "सुनिल अण्णा शेळके दादा एक नंबर" या गाण्याला सार्थकी ठरवत निकालाचा दिवस दणाणून सोडला. 
 Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख