उरुळी कांचन (पुणे) : ग्रामपंचायत निवडणुकीत भावकी-गावकीसाठी प्रसिद्द असलेल्या पुर्व हवेलीमधील लोणी काळभोर या मोठ्या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर हे पुर्व हवेलीमधील दोन मातब्बर नेत्यांनी कंबर कसली आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायती मतदार संख्या एकवीस हजारावर पोचली आहे. ग्रामपंचायतीत सध्या सतरा सदस्य आहेत. सनी काळभोर व प्रशांत काळभोर या दोन्ही नेत्यांनी आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाची सत्ता यावी, यासाठी साम, दाम, दंड व भेद ही निती राबवविण्यास सुरुवात केली आहे. वरील दोन्ही नेत्यांसाठी पैशापेक्षाही प्रतिष्ठा मोठी असल्याने, लोणी काळभोर ग्रामपंचायतीची निवडणुक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, गावातील राजकीय हालचालींना मागिल काही दिवसापासून वेग आला आहे. ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक काम पहात असला तरी, यापुर्वीचे सरपंचपद पाचही वर्षे प्रशांत काळभोर गटाच्या ताब्यात होते. तर शेवटच्या काही काळात सनी काळभोर व त्याच्या गटाने उपसरपंचपदाच्या निवडणुकीत प्रशांत काळभोर यांच्या गटातील सदस्यांना फोडुन आपल्या गटाचा उपसरपंच बनवला होता.
पाच वर्षापुर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व प्रशांत काळभोर यांनी एकत्र येऊन निवडणुक लढवली होती. तर या गटाच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी अध्यक्ष कै. अशोक काळभोर व साधना सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक सुभाष काशिनाथ काळभोर यांच्या नेतृत्वाखालील गटाने एकत्र येत प्रशांत काळभोर यांच्या विरोधात पॅनेल दिला होता. तर लोणी काळभोरचे माजी उपसरपंच योगेश काळभोर यांनी स्वतंत्ररीत्या काही जागी उमेदवार दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दिलासा : नेत्यांना पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #WestBengal #BJP #MamataBanerjee #SupremeCourt #Viral #ViralNews https://t.co/WDOlBFky0D
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 18, 2020
या निवडणुकीत कोणालाही बहुमत न मिळाल्याने, प्रशांत काळभोर व योगेश काळभोर यांनी एकत्र येत, ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली होती. मात्र
या निवडणुकीत राजकीय सुत्रात बदल झाला असून, माधव काळभोर व प्रशांत काळभोर वेगळे झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत काळभोर यांना शह देण्यासाठी हवेली पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी उपसभापती सनी काळभोर यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, साधना सहकारी बॅकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, शिवदास काळभोर, माजी उपसरपंच योगेश काळभोर आदी मात्तबर नेत्यांना एकत्र करत पॅनेलची चाचपणी सुरु केली आहे.
सनी काळभोर व त्यांच्या सहकारी नेत्यांनी वाडीवस्त्यावर जाऊन बैठकांचा सपाटा लावला आहे. एकएक जागेसाठी निवडूण येईल असाच उमेदवार देण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. तर दुसरीकडे यशवंत सहकारी साखऱ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांचे सहकारातील पारंपारीक विरोधक कै, अशोक काळभोर यांच्या गटाशी संधान बांधत, प्रशांत काळभोर यांनी सनी काळभोर यांच्या राजकीय व्युव्हरचनेला शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकत्र असलेले महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व प्रशांत काळभोर या निवडणुकीत समोरासमोर आल्याने, प्रशांत काळभोर गटाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. मात्र, पुर्ण वेळ राजकारणी म्हणून ओळख असलेल्या प्रशांत काळभोर यांनी राहुल काळभोर यांच्या उमेदवारांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देण्याची व्युव्हरचना आखली आहे.
प्रशांत काळभोर यांच्या समवेत बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रताप बोरकर, माजी सरपंच शरद काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष धोंडीबा काळभोर, माजी अध्यक्ष राहुल काळभोर, विठ्ठल काळभोर, बाळासाहेब काळभोर, माजी सरपंच वंदना काळभोर, अश्विनी गणेश गायकवाड आदी नेत्यांनी प्रशांत काळभोर यांच्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
निवडणुक ग्रामपंचायतीची, लक्ष जिल्हा परिषदेचे...
जिल्हा परिषदची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षभराच्या काळात होणार आहे. मागिल पंधरा वर्षाचा इतिहास पाहिला असता, जिल्हा परिषदेचे सदस्यपद सर्वसाधारण गटासाठी आलेले नाही. यामुळे पुढील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदस्य पद सर्वसाधारण महिला अथवा सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर होण्याची शक्यता आहे. याचमुळे आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच, सनी काळभोर व प्रशांत काळभोर यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे. वरील दोन्ही नेते चार वर्षापूर्वी पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत समोरासमोर आले होते. यात सनी काळभोर यांनी बाजी मारली होती. यामुळे निवडणुक ग्रामपंचायतीची असली तरी, लक्ष मात्र जिल्हा परिषद असल्याने आगामी निवडणूक लक्षवेधी होणार यात कसलीही शंका नाही.
निवडणूक लोणी काळभोरची, चर्चा मात्र दौंडच्या मतदारांची...
लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत दौंड तालुक्यातील हजारो मतदारांची नावे घुसडल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांनी केला आहे. याबाबत काळभोर यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र निवडणूक आयोगाने तांत्रीक कारणे पुढे करत, प्रशांत काळभोर यांची मागणी फेटाळल्याने दौंड तालुक्यातील हजारो नावे लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशांत काळभोर यांनी याप्रकरणी मुबंई उच्च न्यायालयात दादही मागितली आहे. यामुळे निवडणुक लोणी काळभोर ग्रामपंचायतीची असली तरी, चर्चा मात्र दौड तालुक्यातील मतदारांची होत आहे.

