महापौर मोहोळ-पीएमपी अध्यक्ष जगताप यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल   - dispute between Mayor Mohol PMP President Jagtap | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

महापौर मोहोळ-पीएमपी अध्यक्ष जगताप यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

पीएमपी आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात  शीतयुद्ध सुरू झाले आहे.

पुणे :  पीएमपीच्या संचालकपदाचा शंकर पवार यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. पीएमपी आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात या कारणावरून शीतयुद्ध सुरू झाले आहे, त्या संचालक  मंडळाच्या बैठकीचा 'तो' वृत्तांत आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. मोहोळ आणि पीएमपीच्या अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यात नेमका वाद काय झाला त्याचे चित्रीकरण या व्हिडिओत आहे.  dispute between Mayor Mohol PMP President Jagtap

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या एक जून रोजी रोजी झालेल्या बैठकीमध्ये नगरसेवक शंकर पवार यांच्या संचालक पदाचा राजीनामा स्थगित करण्यात आला.  पवार यांनी संचालक मंडळाकडे राजीनामा देण्यासाठी पीएमपीच्या अध्यक्षांकडे द्यायला हवा, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी दोन जून रोजी राजीनामा दिला आहे. मात्र पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक झालेली नसल्यामुळे तो अद्याप मंजूर झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर मोहोळ आणि पवार 4 जून रोजी पीएमपीच्या कार्यालयात गेले होते. संचालक मंडळाच्या बैठकीचा वृत्तांत आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी मागितले. परंतु वृत्तांत तयार झाल्या नसल्यामुळे तो नंतर देण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले. व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात आले. परंतु यावेळी मोहोळ यांच्याबरोबरच दोन कर्मचाऱ्यांनी पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात ते नसताना प्रवेश करून लॅपटॉप उघडण्याचा प्रयत्न केला. त्याला पीएमपीच्या सुरक्षारक्षकांनी अटकाव केला आणि पोलिसांना बोलावले. पवार आणि मोहोळ तेथून गेल्यावर पोलिस आले. 

याबाबत पीएमपीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे तर जगताप यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार त्या दोन कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे दिली आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. महापौर मोहोळ आणि पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यात झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचा वृत्तांत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. 

पीएमपीच्या सर्व संचालकांना हा वृत्तांत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रशासनाने पाठविण्याचे ठरविले आहे.  महापालिकेच्या नगरसेवकांनाही तो मिळणार आहे. नागरिकांनी माहिती अधिकारात वृतांत आणि रेकॉर्डिंग मागितल्यास त्यांनाही उपलब्ध करुन दिले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीतील कामकाज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हे शासकीय कामाचा भाग आहे. त्यामुळे बैठकीचा वृत्तांत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग नागरिकांना उपलब्ध करून देता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

पीएमपीच्या संचालक पदाचा वरून भारतीय जनता पक्षात मोहोळ आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांच्यात वाद झाला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यात मध्यस्थी करून हा वाद मिटविला त्याच वेळी पवार यांना राजीनामा देण्यासाठी त्यांनी सांगितले. पीएमपीच्या संचालक पदावरून एवढा वादंग का होत आहे याबद्दल महापालिका वर्तुळात विविध प्रकारे चर्चा सुरू आहे
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख