आमदार संग्राम थोपटेंना ७ जुलैला मिळणार ‘गुड न्यूज’!

शेवटच्या क्षणापर्यंत प्रदेशाध्यक्षपदासाठी थोपटे यांचे नाव स्पर्धेत होते.
Discussion on MLA Sangram Thopte getting the post of Assembly Speaker or Minister
Discussion on MLA Sangram Thopte getting the post of Assembly Speaker or Minister

पुणे : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ जुलैपासून सुरू होणार आहे, त्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांचे नाव घोषित केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीवेळी चर्चेत असलेले भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्षपद किंवा मंत्रिपद मिळण्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. विदर्भातील मंत्र्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद सोपविल्यास त्यांचे मंत्रिपद थोपटेंकडे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विधानसभा अध्यक्षपद किंवा मंत्रिपद या दोन्हींपैकी एक पद थोपटेंना मिळणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे थोपटे यांना येत्या ७ जुलै रोजी ‘गुड न्यूज’ मिळणार, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. (Discussion on MLA Sangram Thopte getting the post of Assembly Speaker or Minister)  

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर त्या पदासाठी नाना पटोले यांच्यासह आमदार संग्राम थोपटे यांचेही नाव चर्चेत होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीवारी करत पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत प्रदेशाध्यक्षपदासाठी थोपटे यांचे नाव स्पर्धेत होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या पटोले यांच्या पारड्यात राहुल गांधी यांनी आपले वजन टाकले आणि नानांच्या गळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील थोपटे घराणे हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाते. आमदार संग्राम थोपटे यांचे वडिल अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी १९९९ मध्ये खुद्द सोनिया गांधी ह्या भोरमध्ये आल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडी आकाराला येऊ लागल्यानंतर मंत्रिपदाच्या चर्चेत आमदार थोपटे यांचे नाव वरिष्ठ पातळीवरून चर्चेत होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील स्वपक्षीयांकडून झालेल्या विरोधामुळे त्यांचे मंत्रिपद हुकल्याची चर्चा आहे.  

प्रदेशाध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यानंतर हायकमांडने त्यांना मंत्रिपद किंवा विधानसभा अध्यक्षपदाचा शब्द दिल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानुसार आमदार थोपटे यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेचे अध्यक्षपद न मिळाल्यास त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, हे मात्र निश्चित आहे. कारण, विदर्भातील एका विद्यमान मंत्र्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद सोपविल्यास आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे त्यांच्याकडील खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या राजीनामा देण्याच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर विधानसभा अध्यक्षपद आता खुले झाले आहे. त्याबाबत नव्याने चर्चा होईल, अशी गुगली टाकली होती. त्यामुळे हे पद कोणत्या पक्षाकडे जाणार, याची उत्सुकता होती. मात्र, ते पद काँग्रेस पक्षाकडेच राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com