तेवीस गावांच्या समावेशावरुन पुण्यात मतभेद.. - Disagreement over inclusion of 23 villages in PMC Politics in pune  | Politics Marathi News - Sarkarnama

तेवीस गावांच्या समावेशावरुन पुण्यात मतभेद..

उमेश घोंगडे 
शनिवार, 19 डिसेंबर 2020

नव्या सर्व गावांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेनऊ हजार कोटी खर्च करणे सध्या कुणालाच शक्‍य नाही.

पुणे : महापालिकेत 23 गावे समाविष्ट करण्यास विरोध नाही. मात्र, एकाचवेळी सर्व गावांचा समावेश करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने समावेश झाल्यास या गावांचा विकास करणे आणि त्यासाठी निधी उभारणे शक्‍य होईल, अशी भूमिका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. एकाचवेळी सर्व गावांचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा आग्रह असेल तर या सर्व गावातील पायाभूत सुविधांसाठी लागणारे साडेनऊ हजार कोटी रूपयांचा निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणी महापौर मोहोळ यांनी केली.

"सरकारनामा'शी बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, "याआधी 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रूपयांची गरज आहे. त्यासाठीदेखील निधीची कमतरता आहे. कोरोनाच्या संकटचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेचे सुमारे साडेचारशे कोटी रूपये आतापर्यंत खर्च झाले आहेत.

परिणामी महापालिका अर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशावेळी नवी सर्व गावे एकाचवेळी पालिकेत घेऊन पायाभूत सुविधा कशा देणार हा प्रश्‍न आहे. त्यामुळे नव्या गावांचा विकास करण्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारने द्यावा. नव्या सर्व गावांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यासाठी साडेनऊ हजार कोटी खर्च करणे सध्या कुणालाच शक्‍य नाही. यावर उपाय म्हणून या गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश केला तर अर्थिक ताण पडणार नाही तसेच विकास चांगल्या पद्धतीने करणे शक्‍य होईल.''

पुणे महापालिकेतील 23 गावांच्या समावेशावरून सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून एकाचवेळी सर्व गावांचा समावेश करण्याचा आग्रह धरण्यात येत असल्याचा या चर्चेचा सूर आहे. प्रस्तावित 23 गावांचा राजकीयदृष्ट्या विचार केला तर राष्ट्रवादीचा प्रभाव असलेली ही गावे असल्याने महापालिकेत पक्षाला सत्ता स्थापन करणे सहज शक्‍य असल्याचे बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख