Dilip Mohite criticizes Sanjay Raut for supporting Khed's Sabhapati
Dilip Mohite criticizes Sanjay Raut for supporting Khed's Sabhapati

तलवारी, रिव्हॉल्वर घेऊन फिरणाऱ्याची संजय राऊतांकडून पाठराखण 

हे खासदार राऊत यांनी जाणून घ्यायला पाहिजे होते.

राजगुरूनगर (जि. पुणे) : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल (ता. ४ जून) जो सर्व आटापिटा ज्याच्यासाठी केला, तो माणूस तलवारी, रिव्हॉल्वर घेऊन मारामारी करतो. अशा माणसाची खासदार राऊत यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने पाठराखण करावी, हे चुकीचे आहे. ते माहिती न घेता बोलले. कमिटमेंट न पाळल्यामुळेच पोखरकरांवर शिवसेनेच्याच लोकांनी अविश्वास आणला आणि खापर माझ्यावर फोडले जात आहे, हे राऊत यांनी जाणून घ्यायला पाहिजे होते, असे भावनाही आमदार दिलीप मोहिते यांनी राऊतांच्या कालच्या शाब्दीक हल्ल्यावर व्यक्त केली. (Dilip Mohite criticizes Sanjay Raut for supporting Khed's Sabhapati) 

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेचे भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलेल्या संजय राऊत यांनी मोहिते यांच्यावर कडवट टीका केली होती. अजितदादांनी मोहितेंचा बंदोबस्त करावा; अन्यथा शिवसेनेला मुभा द्यावी, असा इशाराच त्यांनी दिला होता. त्यावर मोहिते बोलत होते.

आमदार मोहिते म्हणाले की, खासदार संजय राऊत यांच्यासारख्या मोठ्या माणसाने बोलल्यानंतर मी काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे काही सदस्य पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनी आमची (राष्ट्रवादीची) मदत घेऊन पहिल्यांदा एक सभापती केला. दुसऱ्यांदा भगवान पोखरकर हे सभापती झाले. त्यांच्या आपसातल्या कमिटमेंट न पाळल्यामुळे सभापती पोखरकर यांच्यावर त्यांच्या लोकांनी अविश्वास ठराव आणला आणि खापर माझ्यावर फोडले जात आहे, हे खासदार राऊत यांनी जाणून घ्यायला पाहिजे होते. 

अविश्वास ठरावाच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी पोलिस यंत्रणेबाबतही नाराजी व्यक्त केली होती. अज्ञाताने केलेल्या कथित गोळीबाराचा संदर्भ सभापतींशी जोडून, त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखा काळा बुरखा घालणे, परेडला उभे करणे अयोग्य आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाने गोळीबार केला. मग त्याला अटक करताना काळा बुरखा का घातला नाही? शिवसेनेच्या सभापतींना जशी वागणूक दिली, तशी बनसोडेंना का दिली नाही? कायदा सर्वांसाठी सारखा आहे. या विषयाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, असे म्हटले होते.

त्याबाबत आमदार मोहिते म्हणाले की राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अटक केल्यानंतर त्यालाही पोलिसांनी बुरखा घातला होता आणि पोखरकर यांनाही घातला. कारण, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. 

जिल्हा कसा चालवयाचा, याचा निर्णय अजित पवार घेतात

पुणे जिल्ह्याचे नेते अजित पवार आहेत. जिल्हा कसा चालवायचा, याचे सर्व निर्णय ते घेतात. त्यांना राजगुरुनगरला आणून जागा दाखवल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे कार्यवाही केली. पंचायत समितीच्या जागेवर, पंचायत समिती इमारतीसाठी जागा आहे आणि प्रशासकीय इमारत त्याच्या समोरच्या जागेत व्हावी. एवढी छोटीशीच गोष्ट होती. त्याचा पराचा कावळा यांनी केला, असेही मोहिते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com