श्रेयासाठी हपापले आंबेगावातील नेते 

रुग्णवाहिकेमध्ये 16 गावांच्या 14 व्या वित्त आयोगाचा निधी असून कोणत्या एकट्या ग्रामपंचायतीचा नाही.
Dedication of the same ambulance four times in Ambegaon taluka
Dedication of the same ambulance four times in Ambegaon taluka

पारगाव (जि. पुणे) : महाविकास आघाडीच्या नावाखाली राज्यात सत्तेत एकत्र नांदणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील नेत्यांमधून विस्तवही जात नाही. गेल्या काही महिन्यांपासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचा दुसरा अंक आता याच मतदारसंघातील आंबेगाव तालुक्‍यात पहायला मिळत आहे. कारण, एकाच रुग्णवाहिकेचे या पक्षांनी चार वेळा लोकार्पण केले आहे. 

आंबेगाव तालुक्‍यातील धामणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी घेण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेना व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे दोनदा केले आहे. त्यामुळे राज्यात आघाडी झाली असली तरी कार्यकर्त्यांची मने मात्र अजूनही जुळायला तयार नाहीत, असेच दिसते. या एकाच रुग्णवाहिकेचे एकूण चार वेळा लोकार्पण करण्यात आलेले आहे. 

ग्रामपंचायतींच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुसज्ज रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे काही दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा एकत्रित कार्यक्रम झाला. 

तालुक्‍यात डिंभे बुद्रूक, निरगुडसर, पेठ, धामणी, तळेघर, अडिवरे या सहा गावांसाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. निरगुडसर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते, तर पेठ येथे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर यांच्या पुढाकाराने याच रुग्णवाहिकेचा प्रदान सोहळा झाला. 

त्यानंतर तिसऱ्यांदा शिवसेनेचे नेते, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव यांनी धामणी येथे लोकार्पण केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धामणीच्या रुग्णवाहिकेमध्ये 16 गावांच्या 14 व्या वित्त आयोगाचा निधी असून कोणत्या एकट्या ग्रामपंचायतीचा नाही, असे सांगत या रुग्णवाहिकेचा पुन्हा चौथ्यांदा प्रदान कार्यक्रम घेतला. आम्ही एकमेकांचे अजूनही विरोधकच असल्याचे दाखवून दिले आहे. आता हा दोन्ही पक्षातील वाद कुठपर्यंत जातो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

या वेळी जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन जाधव, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, लोणीच्या सरपंच उर्मिला धुमाळ, लाखणगावच्या सरपंच प्राजक्ता रोडे, पहाडदराचे सरपंच राजश्री कुरकुटे, वडगावपीरचे सरपंच संजय पोखरकर, मनोज तांबे, महादू बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com