बारामतीचे लॉकडाउन उठविण्याचा निर्णय; सोमवारपासून व्यवहार सुरळीत  - Decision to lift the lockdown in Baramati from Monday | Politics Marathi News - Sarkarnama

बारामतीचे लॉकडाउन उठविण्याचा निर्णय; सोमवारपासून व्यवहार सुरळीत 

मिलिंद संगई 
रविवार, 20 सप्टेंबर 2020

हॉटेल, जिम, पानपट्टी, शाळा महाविद्यालय या सह केंद्र व राज्य सरकारने ज्यावर प्रतिबंध घातला आहे, अशा बाबी वगळता इतर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

बारामती : गेले १४ दिवस सुरु असलेला लॉकडाऊन सोमवारपासून (ता. २१ सप्टेंबर) मागे घेण्यात येणार आहे. ठराविक अपवाद वगळता इतर सर्व व्यवहार सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. 

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात आज (ता. २० सप्टेंबर) झालेल्या बैठकीत कांबळे यांनी हा निर्णय जहीर केला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

हॉटेल, जिम, पानपट्टी, शाळा महाविद्यालय या सह केंद्र व राज्य सरकारने ज्यावर प्रतिबंध घातला आहे, अशा बाबी वगळता इतर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दुकानदार व त्यांचे कर्मचारी तसेच दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर अनिवार्य असेल. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हात सॅनेटायझरने स्वच्छ केले जातील. प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्क्रिनींग व ऑक्सिजन लेव्हलचीही तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकाचा नाव पत्ता व मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

दरम्यानए किराणा मालाच्या दुकानातून पानपट्टीवरील काही वस्तूंची सर्रास विक्री सुरु असल्याची तक्रार या बैठकीत झाली. अशी विक्री करताना कोणीही दुकानदार आढळल्यास त्यावर कडक कारवाईचा इशारा कांबळे यांनी दिला. याशिवाय बाजारपेठेमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्याबाबतही सूचना करण्यात आली. 

बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सुशील सोमाणी, प्रवीण आहुजा, स्वप्नील मुथा, विजय आगम यांनी या वेळी सूचना मांडल्या. रमणिक मोता, फखरुशेठ भोरी, नरेंद्र मोता, भारत खटावकर, श्यामराव तिवाटणे, शैलेश साळुंके, किरण गांधी, सागर चिंचकर, महेश साळुंके, दीपक मचाले, गणेश फाळके आदी या बैठकीस उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख