सरपंच-उपसरपंच निवडीच्या जल्लोषानंतर तरुण कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू 

जल्लोष साजरा करून घरी जात असतानाच रस्त्यातच त्याला अचानक अत्यावस्थ वाटू लागले.
Death of a young activist in Khed after the victory procession of Sarpanch-Deputy Sarpanch
Death of a young activist in Khed after the victory procession of Sarpanch-Deputy Sarpanch

कडूस (जि. पुणे) : सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीनंतर जल्लोष करून घरी जात असताना खेड तालुक्‍यातील रानमळा येथील नवनाथ सुरेश रायकर या पंचवीस वर्षीय तरुणाचा रस्त्यातच मृत्यू झाला. 

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत राज्यात आदर्श असलेल्या रानमळा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी गुरुवारी (ता. 25 फेब्रुवारी) निवडणूक झाली. ग्रामपंचायतमधील नऊच्या नऊ सदस्यांची निवड बिनविरोध होऊनही सरपंच व उपसरपंच निवडीसाठी चार सदस्य अनुपस्थित राहिले होते. या निवडणुकीत प्रमोद शिंदे यांची सरपंचपदी, तर रोहिणी दौंडकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध झाली होती. 

निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कांचन ढमाले, प्रताप ढमाले, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, सचिव नितीन ताठे, मनोज खराबी, मंगेश सावंत, सचिन डुंबरे आदींच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच प्रमोद शिंदे व उपसरपंच रोहिणी दौंडकर यांचा सत्कार करण्यात आला. 

सत्कार समारंभानंतर सरपंच व उपसरपंचांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला. गुलाल भंडाऱ्याची उधळण झाली. जेसीबीवरून नव्या पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. या जल्लोषात नवनाथ रायकर हा सुद्धा सहभागी झाला होता. त्याने सुद्धा नाचून आनंदोत्सव साजरा केला होता. जल्लोष साजरा करून घरी जात असतानाच रस्त्यातच त्याला अचानक अत्यावस्थ वाटू लागले. चक्कर येऊन तो रस्त्यातच मूर्च्छित पडला. 

काही नागरिकांकडून त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते, परंतु त्या अगोदरच त्याची प्राणज्योत मालवली होती. शवविच्छेदनानंतर शुक्रवारी दुपारी रानमळा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


हेही वाचा : सरपंचाच्या विजयी मिरवणुकीत चक्क नोटांची उधळण! 

दावडी : गावगाड्याचा कारभार आणि तेथील कारभारी ह्यांची निवड हा अनेकांना धक्के देणारा असतो. या निवडणुका त्वेषाने लढल्या जातात आणि जिंकल्यानंतरही त्याच पद्धतीने विजयी मिरवणुकाही काढल्या जातात. सध्या जेसीबीतून गुलाल उधळण्याची आणि क्रेनच्या साहाय्याने हार घालण्याची प्रथा रुढ होऊ पाहत आहे. याबरोबरच खेड तालुक्‍यातील दावडी येथील सरपंच आणि उपसरपंच निवडीनंतर एका उत्साही कार्यकर्त्याने चक्क नोटांची उधळण करत जल्लोष केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

आरक्षणाच्या प्रश्‍नावरून काही ग्रामपंचायती कोर्टात गेल्या होत्या. त्यामुळे खेड तालुक्‍यातील सरपंच आणि उपसरपंच निवडी विलंबाने झाल्या आहेत. त्यानुसार दावडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाची बुधवारी (ता. 24 फेब्रुवारी) निवडणूक झाली. त्यानुसार निवडणुकीत सरपंचपदासाठी संभाजी घारे यांची, तर उपसरपंचपदी राहुल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला. 

त्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांची सत्ताधारी पॅनेलच्या लोकांनी गावातून मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम आखला होता. पण मिरवणुकीपूर्वी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी भलामोठा हार आणून तो क्रेनच्या साहाय्याने सरपंच आणि उपसरपंचांना घालण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार तो मोठा हार क्रेनच्या मदतीने नव्या पदाधिकाऱ्यांना घालण्यात आला. त्यानंतर मात्र एका उत्साही कार्यकर्त्याने खिशातून नोटांचे बंडल बाहेर काढले आणि मिरवणुकीत चक्क नोटांची उधळण करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com