दत्तात्रेय भरणे फक्त फोटोपुरते : हर्षवर्धन पाटील यांची टीका

राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी तालुक्‍याचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
Dattatreya bharane only for photos : Criticism of Harshvardhan Patil
Dattatreya bharane only for photos : Criticism of Harshvardhan Patil

इंदापूर (जि. पुणे) : अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्‍याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इंदापूरलगतच्या सोलापूरला गेले, तेथे त्यांनी नुकसानग्रस्तांना मदत केली. त्यांच्यासमवेत सोलापूरचे पालकमंत्री तथा इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे होते. नुकसान दाखविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना इंदापुरात आणणे गरजेचे होते. मात्र त्यांनी आणले नाही. त्यामुळे इंदापूरचे लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांनी फोटो काढण्यापुरती भूमिका न घेता या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करावे, अशी उपरोधिक टीका भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. 

अतिवृष्टीमुळे तालुक्‍यात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्‍याचे सर्वाधिक नुकसान झाल्याने राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी तालुक्‍याचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला. मात्र, मुख्यमंत्री सोलापूरला आले मात्र, इंदापूरला आले नाहीत आणि तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींनी तसे प्रयत्न केल्याचे दिसत नाही, असा टोला लगावला. 

इंदापुरात सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस पडला. किमान सहा वेळा अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेले खरीप व रब्बी पीक गेले. फळबागांचे अतोनात नुकसान झाले. नगदी पीक असलेल्या उसाची वाट लागली. त्यामुळे पंचनामे करण्याबरोबरच शेतकऱ्यांना हेक्‍टरी किमान 25 हजार रुपयांची मदत करणे गरजेचे आहे. इंदापूर शहर, तालुक्‍यात 18 ते 20 हजार घरांमध्ये पाणी गेले.

याशिवाय काही दवाखान्याच्या तळमजल्यात पाणी गेल्याने 6 फूट गाळ साचला, त्यामुळे संबंधितांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. व्यापारी संकुलात पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले. अनेकांना शाळेत आश्रय घ्यावा लागला, असे त्यांनी सांगितले. 
तालुक्‍यात 1 लाख 52 हजार हेक्‍टर शेती क्षेत्र असून पैकी 20 हजार हेक्‍टर जिरायत, 30 हजार हेक्‍टर आठमाही तर उर्वरित बारमाही आहे.

नुकसानीचा रिमोट सेन्सर पद्धतीने उपग्रहाद्वारे सर्व्हे केल्यास एका दिवसात गुगल मॅपिंगद्वारे तालुक्‍याचे नुकसान समजेल. कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे 1 ते 2 लाख रुपयांची मदत करता येईल. पण, सरकार नुसता दिखावा करत आहे, असा आरोपही पाटील यांनी या वेळी केला. 

नीरा नदीवरील 22 ते 24 बंधारे पाण्याखाली आहेत. मात्र, त्याची दुरुस्ती न झाल्यास 15 डिसेंबरनंतर 1 थेंब पाणी नदीत रहाणार नाही. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात मंत्री असताना रस्त्याची वाट लागली आहे.

सोलापूर जिल्ह्यात धनादेशाचे वाटप होते. मात्र, इंदापूर तालुक्‍यात मदत मिळत नाही, ही शोकांतिका आहे. केंद्राचे पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी लवकरच येणार आहे. मात्र, शेतकरी, कष्टकऱ्यांना प्रथम मदत करायची जबाबदारी राज्य सरकार व तालुका लोकप्रतिनिधींची असते, याची जाणीव या वेळी पाटील यांनी करून दिली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com