स्थानिकांना लस मिळणार नसेल तर ही केंद्रेच बंद करून टाका : शहरी अतिक्रमणामुळे ग्रामीण भागात नाराजी

स्थानिकांना लस उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Crowd of citizens from Pune, Pimpri at the vaccination center in Uruli Kanchan, Loni Kalbhor
Crowd of citizens from Pune, Pimpri at the vaccination center in Uruli Kanchan, Loni Kalbhor

लोणी काळभोर (जि. पुणे) : उरुळी कांचन (Uruli Kanchan), लोणी काळभोर (Loni Kalbhor), कुंजीरवाडी (Kunjirwadi), वाडे बोल्हाईसह (Wade Bolhai) पूर्व हवेलीतील (Haveli) चार लसीकरण केंद्रे (Vaccination Centers) ग्रामीण भागात येतात. मात्र, या चारही केंद्रांवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड ते थेट लोणावळा भागातील नागरीकांचे लसीकरण होत असल्याचे पुढे आले आहे. लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना अॅपवर शहरी भागातील नागरिकांचे नंबर लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकामंध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. 

उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाडे बोल्हाईसह पूर्व हवेलीमधील चार लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरीकांना लस मिळणार नसेल तर, ही केंद्रे ताबडतोब बंद करण्यात यावीत अशी मागणी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन यांनी हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्याकडे केली आहे. तसेच, पुढील दोन दिवसांत या चारही लसीकरण केंद्रावर स्थानिकांना लस उपलब्ध करुन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर व सरपंच संतोष कांचन यांनी दिला आहे. 

उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाडेबोल्हाई यांसह  ग्रामीण भागातील सर्वच लसीकरण केंद्रावर मागील पाच ते सहा दिवसांपासून 18 ते 44 वर्षांमधील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. नागरीकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण देणे बंद आहे. याचा फटका ग्रामीण नागरीकांना बसत आहे. 

रजिस्ट्रेशनसाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, हे अॅप सुरु झाल्याचे समजण्यापूर्वीच शहरी भागातील नागरीक  रजिस्ट्रेशन करुन मोकळे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे या चार लसीकरण केंद्रावर ९८ टक्के लसीकरण हे बाहेरच्या व्यक्तीचेच होत असल्याचे पुढे आले आहे. 

अॅपमध्ये सुधारणा करा  

उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन म्हणाले, पूर्व हवेलीतील  चार लसीकरण केंद्रांची माहिती घेतली असता ९८ टक्के बाहेरचे नागरीक लस घेत असल्याचे दिसून आले आहे. स्थानिकांना लस मिळत नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. कोरोना वाढू नये, यासाठी लॉकडाउन सुरु असताना, पुणे शहर, पिंपरी चिंचवड हद्दीतील नागरीक आमच्याकडे गर्दी करत आहेत. शहरी भागातील उच्चशिक्षित लोक अॅपवर त्वरीत माहिती भरत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना नाव नोंदविण्याची संधीच मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरीक लसीपासून वंचीत राहत आहेत. ग्रामीण भागातील नागरीकांना लस मिळावी, यासाठी अॅपमध्ये सुधारणा करावी अथवा ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे बंद करावीत, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. 

केंद्राचा अॅप असल्याने काहीही करता येत नाही ः तहसीलदार

हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे म्हणाले, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील नागरीकांना अॅपवर नाव नोंदविण्याची संधीच मिळत नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. हा अॅप केंद्र सरकारचा असल्याने याबाबत काहीही करता येत नाही. मात्र, नागरीकांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोचवण्यात येणार आहेत. तसेच, ग्रामीण भागातील नागरीकांनाही लस मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू ः आमदार अशोक पवार

आमदार अशोक पवार म्हणाले, केवळ पूर्व हवेलीमधीलच नव्हे तर ग्रामीण भागातील सर्वच लसीकरण केंद्रावर शहरी भागातील नागरीकांचे लसीकरण होत आहे. लसीकरण केंद्र असलेल्या गावातीलच नागरीकांना लस मिळत नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. पूर्व हवेलीमधील अनेक गावांच्या सरपंचांनी स्थानिक नागरीकांना जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. याबाबतचा पाठपुरावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुरू आहे. यामुळे पुढील काही दिवसांत लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. 


लसीसाठी कसे कराल रजिस्ट्रेशन?

►आरोग्य सेतू मोबाईल अॅपवर कोविन डॅशबोर्ड दिसेल किंवा www.cowin.gov.in इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन/रजिस्टरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला १० अंकी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

►त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर रजिस्ट्रेशनचा दुसरा टप्पा सुरू होईल

►यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या फोटो आयडी कार्डपैकी एकाची निवड करावी लागेल.

►तसेच नाव, जन्मतारीख, लिंग ही माहिती भरावी लागेल

►यानंतर समोर दिसणाऱ्या पेजवर एकाच मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने तुम्हाला जास्तीत जास्त चार लाभार्थींची नावं जोडता येतील.


► त्यानंतर तुमच्या ठिकाणाचा पिन कोड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची एक यादी दिसेल. यापैकी एका केंद्राची निवड तुम्हाला करावी लागेल

►त्यानंतर तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे लसीकरणासाठी तारीख आणि वेळ निवडू शकाल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com