पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात नवीन १८०० रुग्ण... - Corona Cases rises in pune gives alert to peoples | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात नवीन १८०० रुग्ण...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

एकूण चाचण्यांच्या तुलनेत आढळून येणारी रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुणे : शहरात कोरोनाचा कहर वाढत चालला असून शुक्रवारी सुमारे १८०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांच्या तुलनेत आढळून येणारी रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

फेब्रुवारी महिन्यापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. मार्च महिन्यात ही वाढ वेगाने होत असल्याचे दिसते. मागील काही दिवसांपासून दररोज नवीन आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा नवा उच्चांक गाठण्याच्या दिशेने पुढे जात आहे. शहरातील कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शहरात एका दिवसांतील नवीन रुग्णांचा आकडा जवळपास २३०० पर्यंत गेला होता. कोरोनाच्या सध्याच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या त्यापुढे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

शहरात आज दिवसभरात सुमारे ८ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या. तर नव्याने सुमारे १८०० रुग्ण आढळून आले आहेत. काल नवी रुग्णांची संख्या सुमारे १५०० एवढी होती. तर बुधवारी जवळपास १३०० नवीन रुग्ण आढळले होते. पहिली लाट ओसरल्यानंतर शहरातील निर्बंध कमी करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यवहार खुले झाले. परिणामी, शहरातील गर्दी वाढली. अनेकांकडून मास्क लावणे, अंतर राखणे, स्वच्छता याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी आज पुणे शहरात ३१ मार्चपर्यंत नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, लाॅकडाऊन लागणार नाही. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यात हे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

या बैठकीला पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचे महापौर, जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिका आयुक्त, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यात काल १५०४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ८१२, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३८८ रुण सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लावण्यात आले आहे. आज रात्रीपासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे. लसीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणार असल्याचेही राव यांनी सांगितले. खासगी सोसायट्यांमधील क्लब हाऊस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे आहेत नवे निर्बंध

रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी
शाळा- महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट 
लग्न समारंभ आणि अंत्यविधी कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींची उपस्थिती
हॉटेल्स, दुकाने, बिअर बार रात्री दहा वाजेपर्यंत खुले
हाॅटेल्स-बार ५० टक्के क्षमतेने चालवण्याची मुभा
हाॅटेलबाहेर बसलेल्या ग्राहकांची संख्या बोर्डावर लावणे बंधनकारक
११ पर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी
शहरातील सर्व उद्याने बंद सायंकाळी ठेवणार
गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्लब हाऊस बंद ठेवणार
अभ्यासिका निम्म्या क्षमतेने चालू ठेवणार
विवाह सोहोळ्यांसाठी पोलिस परवानगी आवश्यक
नियमभंग दिसल्यास हाॅल सील करण्याची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख