अजित पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या 8 जणांना कोरोना.. - Corona to 8 people present at Ajit Pawar meeting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

अजित पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या 8 जणांना कोरोना..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

अजित पवार यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या  ८ ग्रामस्थांचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह  आला आहे.  

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या  ८ ग्रामस्थांचा  कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह  आला आहे.  

दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने प्रचार सभा घेत आहेत. सभेला मोठी गर्दीही होत आहे. काल सकाळी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे सभा झाली. सभेनंतर येथील आठ जणांना त्रास सुरू झाल्यानंतर तपासणी केल्यानंतर कोरोना ते पॅाझिटीव्ह आले आहेत. यापैकी दोन जण अजित पवारांच्या व्यासपीठावर असल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची  दोन दिवसापूर्वी पंढरपुरात सभा झाली. या सभेला हॅालच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांची गर्दी झाली होती. सभेच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला होता. त्यानंतर सभेचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमवल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा आखडा आता चांगलाच तापू लागला आहे. प्रचारसभेसाठी मतदारसंघाच्या बाहेरून येणारे राजकीय नेते वैयक्तीक उणीदुणी पंढरीच्या प्रचारसभांच्या आखाड्यात काढू लागल्यामुळे सर्वसामान्यांची करमणूक होत असली तरी मतदारसंघाच्या मूळ प्रश्नाकडे सोयीस्कररीत्या बगल दिली जात आहे. असा सूर मतदारसंघातून निघू लागला आहे.
 
महाविकास आघाडीच्या माध्यमातून पंढरपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देत भगिरथ भालके यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे, उमेदवार भगिरथ भालके यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेचे नेते सक्रिय झाले आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना संधी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे सहभागी झाले आहेत. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारासाठी रविकांत तुपकर आणि माजी खासदार राजू शेट्टी हे सहभागी झाले. अपक्ष उमेदवार असलेल्या शैला गोडसे यांच्या प्रचारामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख सहभागी झाले आहेत. मात्र, त्यांचा मुद्दा हा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामाच्या संदर्भात आहे. मात्र, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी मात्र त्यांच्या वैयक्तिक मतदारसंघातील उणीदुणी पंढरीच्या आखाड्यात काढली जात आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख